Chandrapur Crime News Ballarpur police seized ganja from two accused

बल्लारपूर-बामणी मार्गावर ओडिशातून आणलेला ५ किलो गांजा जप्त; चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोघांना बेड्या

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 5, 2026

चंद्रपूर: Chandrapur Crime News बल्लारपूर-बामणी मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली. ओडिशातून आणलेला ५.७४९ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला.

या कारवाईत पोलिसांनी दोन तस्करांना जेरबंद केले. त्यांच्याकडून ३.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Chandrapur Crime News: एलसीबीची बल्लारपूर मार्गावर मोठी कारवाई

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक व छुप्या पद्धतीने होणाऱ्या विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सुरू केलेल्या धडक मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध रीतीने सापळा रचून बल्लारपूर-बामणी मार्गावर ओडिशातून आणलेला सुमारे ५.७४९ किलो गांजा जप्त करत दोन तस्करांना जेरबंद केले. या कारवाईत आरोपींकडून गांजासदृश अमली पदार्थ, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या बॅगा असा एकूण अंदाजे ३ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर-नागपूर मार्गावर १ किलो गांजा जप्त)

बल्लारपूर ते बामणी मार्गावर मध्यरात्री रचला सापळा

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नियमित पेट्रोलिंग करीत असताना, दोन संशयित इसम बल्लारपूर येथून बामणीमार्गे चामोर्शीच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गांजाची वाहतूक करणार असल्याची खात्रीशीर व गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून राजपत्रित अधिकारी तसेच पंचांसमक्ष बल्लारपूर-बामणी मार्गावरील होंडा शोरूम व जिओ सेंटर परिसरात मध्यरात्रीच नाकाबंदी करून सापळा रचला.

ओडिशातून आणलेला ५.७४९ किलो गांजा पोलिसांनी केला जप्त

दरम्यान, पहाटे सुमारे २.३५ वाजताच्या सुमारास मिळालेल्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या दोन संशयित व्यक्ती हातात लाल-काळ्या रंगाच्या बॅगा घेऊन पायी बामणीच्या दिशेने जाताना पोलिसांना दिसून आल्या. दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न लावता त्यांना जागीच घेरून ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे मंगेश संतोष उंदीरवाडे (वय २३ वर्षे, रा. सोनापूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) आणि सागर बाबूराव मरगडे (वय १९ वर्षे, रा. निमगाव, ता. पवनी, जि. भंडारा) अशी असल्याचे सांगितले. त्यानंतर राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडील बॅगांची कसून झडती घेण्यात आली. या झडतीत बॅगेमध्ये ब्राऊन पॅकिंग टेपने व्यवस्थित गुंडाळलेली पार्सल्स तसेच सुटा गांजा असा एकूण ५.७४९ किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजासह दोन मोबाईल, रोख ३,८०० रुपये आणि साहित्य जप्त केले. प्राथमिक चौकशीत हा गांजा ओडिशा राज्यातून छुप्या मार्गाने विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (एनडीपीएस अ‍ॅक्ट) अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या आंतरराज्यीय रॅकेटची पाळेमुळे कुठपर्यंत पसरली आहेत याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.

सदर धडक कारवाई चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गोरकर, पोहवा सतीश आवठारे, पोहवा इम्रान खान, पोहवा लाले यादव, पोहवा संदीप, पोहवा प्रफुल गारघाटे, पोहवा किशोर वैरागडे, पोहवा हिरालाल गुप्ता, पोअं. किशोर वाकडे, पोअं. शशांक बदामवार, चा.पो.अ. मिलिंद टेकाम तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोहवा कार्तिक खणके यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धाडसी कारवाईमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment