चंद्रपूर: राज्यात बंदी असलेला सुगंधित आणि मानवी आरोग्यास घातक ठरणारा सुगंधित तंबाखू तेलंगणा राज्यातून बेकायदेशीरपणे वाहून आणणाऱ्या दोन तस्करांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. चंद्रपूर सुगंधित तंबाखू जप्त प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख २३ हजार ३७५ रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई १३ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, हा तंबाखू तेलंगणा राज्यातून विक्रीसाठी आणला जात होता.
साहिल वांढे (२४) आणि वसंत नरड (६०) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. (२२ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अटकेत, वाचा बातमी)
चंद्रपूर सुगंधीत तंबाखू जप्त: एलसीबीची कारवाई
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पथक पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीमध्ये आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष गस्त व पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, पथकाला आपल्या गुप्त बातमीदाराकडून तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणावर बंदी असलेला सुगंधित तंबाखू चंद्रपूर शहरात विक्रीसाठी आणला जात असल्याची अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने चंद्रपूर शहर हद्दीत अत्यंत चलाखीने सापळा रचला. संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून पोलिसांनी छापा टाकत दोन आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले.
साहिल वांढे आणि वसंत नरड यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता साहिल मंगल वांढे (वय २४ वर्षे, रा. बिनबागेट वार्ड, चंद्रपूर) आणि वसंत नागोजी नरड (वय ६० वर्षे, रा. हनुमान वार्ड, चंद्रपूर) अशी त्यांची नावे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींची अंगझडती आणि त्यांच्याकडील वाहनाची पाहणी केली असता, तेलंगणा राज्यातून विनापरवाना व छुप्या मार्गाने आणलेली प्रतिबंधित सुगंधित तंबाखू (हुक्का शिशा, ईगल हुक्का शिशा इत्यादी) तसेच गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची मोटारसायकल (क्रमांक MH-34 AR-9909) आढळून आली. पोलिसांनी तंबाखूचा साठा आणि दुचाकी असा एकूण १,२३,३७५/- रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच जप्त केला असून, या प्रकरणी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही धडाकेबाज आणि यशस्वी कारवाई चंद्रपूर उपविभाग पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली. गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, या बेकायदेशीर तस्करीत आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा सखोल तपास चंद्रपूर शहर पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे चंद्रपूर शहरातील अवैध सुगंधी तंबाखू आणि हुक्का साहित्य पुरवणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






