चंद्रपूर: वर्क फ्रॉम होम फसवणूक प्रकरणात चंद्रपुरातील एका ३२ वर्षीय महिलेची ५ लाख ५७ हजार २११ रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. या प्रकरणी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्चशिक्षित तरुण आणि गृहिणींना ऑनलाईन रोजगाराचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट वाढला असून, चंद्रपुरात एक मोठा सायबर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्रात (CSTPS) (डेप्युटी इंजिनियर) म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स) शिक्षण झालेल्या पत्नीची सायबर भामट्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ आणि प्रॉडक्ट रेटिंगच्या नावाखाली तब्बल ५ लाख ५७ हजार २११ रुपयांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (दुचाकीने तेलंगणातून आणला सुगंधित तंबाखू, एलसीबीने आवळल्या मुसक्या)
वर्क फ्रॉम होम फसवणूक: Telegram वरून आमिष
ऊर्जानगर येथील सीएसटीपीएस कॉलनीत राहणाऱ्या ३२ वर्षीय गृहिणी या घरातूनच नोकरी किंवा कामाच्या शोधात होत्या. यासाठी त्यांनी गुगल, लिंक्डइनसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला बायोडाटा अपलोड केला होता. दरम्यान, २३ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांना Telegram वर सारिका अग्रवाल नामक महिलेचा संदेश आला. तिने न्यू यॉर्क येथील लक्झरी फॅशन आणि लाईफस्टाईल प्रॉडक्ट्स प्रमोट करणाऱ्या ‘MODA OPERANDI’ नावाच्या आंतरराष्ट्रीय कंपनीची एजंट असल्याचे सांगत, कंपनीच्या प्रॉडक्ट्सना ऑनलाईन रेटिंग देऊन आकर्षक कमिशन मिळवण्याचे आमिष दाखवले.
सुरुवातीला कमिशन देऊन विश्वास संपादन
विश्वास बसण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी सुरुवातीला तक्रारदार महिलेचे वर्किंग अकाउंट तयार करून दिले आणि २८ व २९ सप्टेंबर रोजी काही रक्कम भरण्यास लावून त्या बदल्यात कमिशनसह १७,५२६ आणि ३६,१८९ रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले. यामुळे तक्रारदाराचा भामट्यांवर पूर्ण विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराला जास्तीत जास्त कमिशनचे प्रलोभन दाखवून वेगवेगळ्या टप्प्यांत, वेगवेगळ्या युपीआय (UPI) आयडी आणि बँक खात्यांवर पैसे भरायला लावले.
२८ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तक्रारदार महिलेने बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यांमधून एकूण ५ लाख ५७ हजार २११ रुपये आरोपींच्या खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांच्या वर्किंग अकाउंटवर १२ लाख रुपये कमिशन जमा झाल्याचे दिसत होते. मात्र, ही रक्कम काढण्याचा (विड्रॉल) प्रयत्न केला असता व्यवहार पूर्ण झाला नाही. यानंतर आरोपी सारिका अग्रवाल हिने संपर्क साधून, पैसे काढण्यासाठी आणखी ४ लाख ९३ हजार २०६ रुपये भरावे लागतील, तरच पूर्ण रक्कम खात्यात जमा होईल अशी अट घातली.
अतिरिक्त पैशांची मागणी होताच आणि पूर्वीप्रमाणे कमिशन परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदार महिलेच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधून ऑनलाईन तक्रार नोंदवली आणि त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी सायबर पोलीस ठाणे, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष जाऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी आरोपी महिला सारिका अग्रवाल (Telegram ID: @sarika_a82) व तिच्या इतर साथीदारांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) कलम ६६(सी), ६६(डी) सह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील विठ्ठलराव गाडे करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







2 thoughts on “चंद्रपुरातील उच्चशिक्षित महिलेला सायबर भामट्यांचा ५ लाखाचा गंडा”