मेडिकल प्रवेश फसवणूक प्रकरणात चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमबीबीएस प्रवेशाचे आश्वासन, चंद्रपुरातील पालकाला ८.९८ लाखांचा गंडा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 14, 2026

चंद्रपूर: मेडिकल प्रवेश फसवणूक प्रकरणात चंद्रपूरमधील एका पालकाची ८ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (MBBS) प्रवेशासाठी कमी पैशात आणि ओळखीच्या माध्यमातून थेट प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका पालकाची तब्बल ८ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. गुगलवरून ऑनलाईन संपर्क साधून भामट्यांनी ही फसवणूक केल्याप्रकरणी चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात जोगेंदर सिंग (रा. उदयपूर, राजस्थान) आणि ओम प्रकाश राठोड (रा. बीड, महाराष्ट्र) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (चंद्रपुरात उच्चशिक्षित महिलेची फसवणूक, वाचा हि बातमी)

मेडिकल प्रवेश फसवणूक: गुगलवरून झाला संपर्क

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार मंगेश प्रभाकरराव भोंबे (वय ५०, रा. प्लॉट नंबर १९, उपगल्लावर ले-आऊट, तुकूम, चंद्रपूर) हे चंद्रपूर येथे मेडिकल एजन्सी चालवितात. त्यांच्या मुलीच्या एमबीबीएस प्रवेशासाठी आणि त्यांचे मित्र शरद रणदिवे यांच्या मुलाच्या प्रवेशासाठी ते चांगल्या कॉलेजच्या शोधात होते. दरम्यान, त्यांचे मित्र शरद रणदिवे यांनी गुगलवर ऑनलाईन सर्च करून काउन्सेलर ओमप्रकाश राठोड याच्याशी संपर्क साधला होता. त्याचा ओळखीचा जोगेंदर सिंग हा उदयपूर येथील असून तो एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमात कमी पैशात व सेटिंग करून थेट प्रवेश मिळवून देत असल्याचे सांगितले. यापूर्वीही त्याने अनेकांचे प्रवेश केल्याचे सांगून दोघांवर विश्वास संपादन केला.

उदयपूर भेट आणि प्रवेशाचे आश्वासन

विश्वास ठेवल्यामुळे तक्रारदार व त्यांचे मित्र ७ सप्टेंबर २०२५ रोजी उदयपूरला रवाना झाले आणि ८ सप्टेंबर २०२५ रोजी पॅसिफिक कॉलेज, उदयपूर येथे पोहोचले. तिथे ओमप्रकाश राठोडच्या सांगण्यावरून त्यांनी कॉलेजच्या प्रशासकीय अधिकारी शर्मा यांच्याशी भेट घेतली. प्रशासनाने अर्ज भरण्यास सांगून प्रवेश प्रक्रियेसाठी कॉलेजच्या अकाउंटंटच्या बँक खात्यात ऑनलाईन १ लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले. मात्र, काही दिवसांतच त्या महाविद्यालयात नंबर न लागल्याने त्यांनी सदर १ लाख रुपये परत मागितले, जे कॉलेजने १५ दिवसांत परत केले. त्यानंतर जोगेंदर सिंग याने सांगली येथील प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च फॉर मॉडर्न मेडिसिन कॉलेजमध्ये ओळख असल्याचे सांगत तिथे दोघांचेही एमबीबीएसला कन्फर्म प्रवेश करून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी ओपन प्रवर्गातील मुलीसाठी २० लाख रुपये आणि ओव्हरहेड खर्च सांगून वेळोवेळी पैसे मागितले.

तक्रारदार मंगेश भोंबे यांनी जोगेंदर सिंग याने दिलेल्या युपीआय (UPI) आयडीवर आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर ८ नोव्हेंबर २०२५ पासून, तसेच त्यांचे मित्र शरद रणदिवे आणि भाऊ अमोल कोहळे यांच्या खात्यावरून ऑनलाईन स्वरूपात वेळोवेळी पैसे पाठवले. अशा प्रकारे या भामट्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांशी लिंक असलेल्या युपीआयच्या माध्यमातून एकूण ८ लाख ९८ हजार रुपयांची रक्कम उकळली. मात्र, वारंवार पैसे देऊनही प्रवेश न मिळाल्यामुळे आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंगेश भोंबे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात येऊन रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आरोपी जोगेंदर सिंग आणि ओम प्रकाश राठोड यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) कलम ६६(ड) सह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “एमबीबीएस प्रवेशाचे आश्वासन, चंद्रपुरातील पालकाला ८.९८ लाखांचा गंडा”

Leave a Comment