चंद्रपूर: यहोवा यिरे पतसंस्था फसवणूक प्रकरणी चंद्रपुरातील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेचे सीईओ आणि संचालक मंडळातील १२ जणांवर हा गुन्हा नोंदवला गेला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे. वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील चंद्रकिशोर मांडवकर यांनी ही तक्रार दिली. एकूण १३३१ गुंतवणूकदारांची रक्कम अडकल्याचा त्यांचा दावा आहे. (मेडिकल प्रवेशाच्या नावावर लाखोंची फसवणूक, गुन्हा दाखल, वाचा बातमी)
यहोवा यिरे पतसंस्था फसवणूक : तक्रारीतील मुख्य आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकिशोर नामदेव मांडवकर (वय ५२, रा. आनंदवन चौक, द्वारकानगरी, बोर्डा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यांनी याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सीईओ रमेश शामराव बोरकुटे, अध्यक्ष सचिन हरिदास पानघाटे, उपाध्यक्ष एलीजा रमेश बोरकुटे, मॅनेजर तथा संचालक अपेक्षा स्नेहदीप जोब, संचालक अतुल सोपन बनसोड, दुर्गा गौरंग मंडल, वैशाली मधुकर बुच्चे, पल्लवी ऋषी वासेकर, तेजस्विता अनित्य लोखंडे, प्रीती विनोद भिलकर, वैभव गुरुदेव चौधरी आणि विकास देवराव दुधबळे यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.
पतसंस्थेच्या आकर्षक योजना आणि व्याजदर
आरोपींनी कट रचून २६ डिसेंबर २०२३ रोजी चंद्रपूर शहरातील सिडिसीसी बँकेच्या मागे, वरोरा रोड येथे या पतसंस्थेची स्थापना केली होती. संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. यामध्ये वार्षिक ४ टक्के व्याजदराचे बचत खाते, ९.७५ टक्के व्याजदराची मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट), तसेच टीडीएस टाईम डिपॉझिट योजना, युवा बचत धन योजना, मासिक बचत योजना (एमआयएस) आणि महिला व बालकल्याण डोळ्यांसमोर ठेवून कन्यादान योजना व दैनिक ठेव योजनांचा समावेश होता. या योजनांची माहिती चंद्रपूर जिल्ह्यात घराघरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एजंट, फिल्ड ऑफिसर आणि एरिया ऑफिसरची नेमणूक करण्यात आली होती. तसेच प्रत्येक तालुका स्तरावर कस्टमर सर्व्हिस पॉईंट (सीएसपी) सुरू करून त्यामार्फत नागरिकांकडून रकमा स्वीकारल्या जात होत्या व गरजूंना कर्जवाटपही केले जात होते.
मुदत संपूनही रक्कम परत नाही; गुंतवणूकदारांचा दावा
मात्र, मार्च २०२६ मध्ये बऱ्याच गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची मुदत (मॅच्युरिटी) पूर्ण झाल्यानंतरही त्यांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही. संस्थेचे कर्मचारी आणि मॅनेजर यांनी गुंतवणूकदारांना टाळाटाळ करत केवळ पुढील तारखा देऊन वेळेमार मारण्याचे काम केले. याबाबत पिडीत नागरिकांनी आणि खुद्द तक्रारदाराने सीईओ रमेश बोरकुटे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला असता, त्यांनी सर्व,ांचे पैसे परत करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत मागितली होती. परंतु, ठरलेल्या मुदतीतही गुंतवणूकदारांना एक रुपयाही परत देण्यात आला नाही.
तक्रारदार चंद्रकिशोर मांडवकर यांनी स्वतःच्या विविध मुदत ठेवी आणि कमिशनचे मिळून ८ लाख ८४ हजार १७४ रुपये या संस्थेत गुंतवले होते. त्यांच्यासह एकूण १३३१ गुंतवणूकदारांची कष्टाची रक्कम या पतसंस्थेत अडकली आहे. संचालक मंडळाने आपसात संगनमत करून गुंतवणूकदारांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि एकूण ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपयांची अफरातफर करून फसवणूक केली आहे.
गुंतवणूकदारांच्या फसवणुकीची गंभीर दखल घेत रामनगर पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम, १९९९ मधील कलम ३ सह भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३(५), ३१६(२), ३१६(५) आणि ३१८(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत रमेश थिटे करीत असून, एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






