गोंडपिपरी / चंद्रपूर: Gondpipri Crime News गोंडपिपरी तालुक्यातील जुना पोडसा येथे सख्ख्या भावावर काठीने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कपाशीच्या पिकावर तणनाशक फवारल्याच्या संशयावरून हा वाद झाला.
या हल्ल्यात पंढरी मांडवकर हे गंभीर जखमी झाले आहेत. लाठी उपपोलीस ठाण्यात आरोपी प्रवीण मांडवकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे हि वाचा – वरोऱ्यात पुन्हा पिस्तूल जप्त)
कपाशीच्या पिकावर तणनाशक फवारणीच्या संशयावरून उफाळला वाद
शेतातील कपाशीच्या (पराठी) पिकावर तणनाशक फवारणी करून पीक नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून सख्ख्या भावानेच दुसऱ्या भावावर बांबूच्या काठीने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना गोंडपिपरी तालुक्यातील जुना पोडसा येथे घडली आहे. या प्रकरणी लाठी उपपोलीस ठाण्यात आरोपी भावाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडिलांच्या घरासमोर सुरू झाला सख्ख्या भावांमधील जोरदार वाद
मिळालेल्या माहितीनुसार, जुना पोडसा (ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर) येथील रहिवासी पंढरी डोनूजी मांडवकर (वय ३९ वर्षे, व्यवसाय शेती) हे आपल्या कुटुंबासह राहून शेती व्यवसाय करतात. त्यांचे वडील त्यांच्या घरामध्ये स्वतंत्र राहतात, तर त्यांचा लहान भाऊ प्रवीण डोनूजी मांडवकर (वय ३५ वर्षे) हा घराच्या मागील भागात आपल्या कुटुंबासह स्वतंत्र राहतो. दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८:३० वाजताच्या सुमारास आरोपी प्रवीण मांडवकर हा वडिलांच्या बाथरूमजवळ आला आणि वडिलांशी बोलताना पंढरी मांडवकर याने कपाशीच्या पिकावर तणनाशक औषध फवारून पीक मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करू लागला.
भावाचे हे बोलणे ऐकून पंढरी मांडवकर घराबाहेर आले आणि त्यांनी प्रवीणला, “मी कपाशीची झाडे मारत असेल तर तू वडिलांच्या शेतात जाऊन तणनाशक फवारणी कर,” असा जाब विचारला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले असता संतापलेल्या प्रवीण मांडवकर याने जवळच असलेल्या बैलगाडीची (बंडीची) बांबूची काठी (उबारी) उचलून पंढरी यांच्या उजव्या डोळ्याच्या वरील भागावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात पंढरी गंभीर जखमी झाले. भांडण सोडवण्यासाठी त्यांची पत्नी अनिता मांडवकर मध्ये आल्या असता आरोपीने त्यांना व पतीला शिवीगाळ करत मारहाण व वाद सुरूच ठेवला.
आपल्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात येताच जखमी पंढरी मांडवकर यांनी पत्नी अनिता यांच्यासह लाठी उपपोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी फिर्यादीच्या तोंडी जबानीवरून आरोपी प्रवीण डोनूजी मांडवकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१) (धोकादायक हत्याराने दुखापत करणे) आणि कलम ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान व वाद घालणे) अन्वये अपराध क्रमांक ००५५/२०२६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाठी उपपोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निशा गजानन भुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






