चंद्रपूर / वरोरा: Warora Pistol Seized वरोरा शहरात स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकली. मित्र चौकातील एका घरातून ५० हजारांचे पिस्तूल जप्त करण्यात आले.
या कारवाईत संतोष सेलोकार याला अटक करण्यात आली आहे. तसेच शस्त्र देणाऱ्या देवा नौकरकार व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.
वरोरा शहरात बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूर व वरोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने संयुक्तरीत्या मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका आरोपीच्या घरातून ५० हजार रुपये किमतीचे मॅगझिनयुक्त लोखंडी पिस्तूल जप्त करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर हे शस्त्र पुरविणाऱ्या पती-पत्नीचा शोध पोलीस घेत आहेत. (हे हि वाचा – भजे बनविले नाही, पती संतापला, कुऱ्हाडीने हल्ला)
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या जुन्या गुन्ह्यातील (अपराध क्र. ९०२/२०२६) अटकेतील आरोपी संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने याच्याकडे सापडलेले अग्निशस्त्र हे वरोरा येथील देवा नौकरकार याने पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. तसेच देवा नौकरकार याच्याकडे आणखी अग्निशस्त्रे असून ते त्याने मित्र चौक, वरोरा येथील त्याचा नातेवाईक संतोष सेलोकार याच्या घरात लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त खबरेची खातरजमा करून पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा व वरोरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाईची रणनीती आखली.
दिनांक १७ ऑगस्ट २०२६ च्या रात्री पोलीस पथकाने दोन स्वतंत्र पंचांना सोबत घेऊन कमला नेहरू वार्ड, मित्र चौक येथील संतोष दादाजी सेलोकार (वय ४८ वर्षे, व्यवसाय मजुरी) याच्या भाड्याच्या घरावर छापा टाकला. घराची कायदेशीर झडती घेतली असता स्वयंपाकघरातील एका स्टीलच्या डब्यात लपवून ठेवलेले जुने वापरते लोखंडी मॅगझिनयुक्त पिस्तूल आढळून आले. अंदाजे ५० हजार रुपये किमतीच्या या पिस्तूलची लांबी १२.०५ सेंमी असून त्याची मॅगझिन, बॅरल व ट्रिगरसह संपूर्ण तपासणी करून पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करण्यात आला. आधुनिक तपास पद्धतीचा वापर करत या संपूर्ण जप्ती कारवाईचे ‘ई-साक्ष्य’ ॲपद्वारे व्हिडिओ व फोटो चित्रीकरण करण्यात आले.
अटकेतील आरोपीच्या माहितीवरून पोलिसांना मिळाला सुगावा
या अग्निशस्त्राबाबत संतोष सेलोकार याच्याकडे सखोल चौकशी केली असता, हे पिस्तूल त्याचा नातेवाईक देवा भैया नौकरकार व त्याची पत्नी भाग्यश्री देवा नौकरकार (दोन्ही रा. मित्र चौक, वरोरा) यांनी १७ ऑगस्टच्या दुपारी त्याच्या घरी आणून लपवून ठेवल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणी सपोनि शरद शामजी भस्मे यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष दादाजी सेलोकार याच्यासह पाहिजे आरोपी देवा भैया नौकरकार व भाग्यश्री देवा नौकरकार यांच्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याच्या (आर्म्स ॲक्ट) कलम ३ व २५ अन्वये अपराध क्रमांक ९०४/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सेलोकार याला पोलिसांनी अटक केली असून फरार असलेले पती-पत्नी देवा नौकरकार व भाग्यश्री नौकरकार यांचा शोध सुरू आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे, वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ओमप्रकाश सोनटक्के, सपोनि शरद भस्मे, सपोनि लक्ष्मी चौधरी, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस अंमलदार सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, रजनीकांत पुट्टावार, सुखराज यादव, अमोल नवघरे, विठ्ठल काकडे, प्रफुल्ल पुप्पलवार, प्रतीक हेमके, महेश गावतुरे, सौरभ कुलथे, मपोअं. पुजा मोहुर्ले, दिपाली देशमुख, चापोहेकॉ. दिनेश अराडे व प्रशांत बावणे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर मिट्टलवार करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






