चंद्रपूर – Warora Crime News Pistol प्रकरणात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. वरोरा शहरातील वडार वस्ती परिसरात राहणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी पिस्तूल, दोन मॅगझिन आणि १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपी खुनाचा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी वेळेत छापा टाकून हा भयानक कट उधळून लावला आहे. (हे हि वाचा – फार्म हाऊसवर पोलिसांची धाड, शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा रंगला होता जुगार)
संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने (वय ४६ वर्षे, रा. वडार वस्ती, वरोरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी नागपंचमी सणानिमित्त आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पथक वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते. पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी संग्राम लभाने हा कोणाचा तरी खून करण्याच्या उद्देशाने राहत्या घरी बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगून आहे. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तत्काळ वरोरा येथील सत्यम टॉकीजमागील वडार वस्तीतील आरोपीच्या घरावर अचानक छापा टाकला.
पिस्तूल, दोन मॅगझिन आणि १० जिवंत काडतुसांसह ८५ हजार रुपयांचा ऐवज जप्त
पोलीस पथकाने घराची सखोल झाडाझडती घेतली असता, घरात बेकायदेशीरपणे लपवून ठेवलेले एक पिस्तूल, दोन मॅगझिन, १० जिवंत काडतुसे आणि आरोपीचा मोबाईल असा एकूण ८५,००० रुपये किमतीचा ऐवज मिळून आला. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस स्टेशन वरोरा येथे कलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी वरोरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदर धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार यांच्यासह पोलीस अंमलदार नितीन कुरेकर, सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, रजनीकांता पुठ्ठावार, जय सिंह, प्रमोद कोटनाके, अमोल सावे, विठ्ठल काकडे, प्रफुल पुप्पलवार, प्रतिक हेमके, अजित शेंडे, सुमित बरडे, तसेच चालक दिनेश अराडे, मिलिंद टेकाम आणि गजानन मडावी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. आरोपी संघपाल लभाने हा कोणाची हत्या करण्याच्या तयारीत होता, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






