चंद्रपूर: तुकुम जुगार अड्डा चालवल्या प्रकरणी चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. समतानगर येथील एका घरावर २० ऑक्टोबर २०२६ रोजी छापा टाकण्यात आला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, या कारवाईत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १२ लाख ६ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य आहे. सर्व ११ जणांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. (चंद्रपूर जिल्ह्यातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता, वाचा हि बातमी)
रामनगर पोलिसांनी समतानगर, तुकुम येथील एका घरावर छापा टाकत सुरू असलेल्या जुगाराचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत जुगार खेळणारे आणि खेळविणारे असे एकूण ११ जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, त्यांच्याकडून तब्बल १२ लाख ६ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा जुगार मागील अनेक महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
तुकुम जुगार अड्डा : पोलिसांनी कसा टाकला छापा?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगार चालवणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी शोध पथकाला दिले होते. दरम्यान, समतानगर, तुकुम येथील राजेंद्र सोमाजी रायपुरे हा व्यक्ती आपल्या राहत्या घरच्या पहिल्या मजल्यावर अवैध जुगार खेळत व खेळवीत असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांच्या शोध पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी २० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४:५० वाजता संबंधित घरावर अचानक छापा टाकला.
जप्त मुद्देमाल आणि अटक झालेले जुगार बहाद्दर
या छाप्यात पोलिसांनी घरमालक राजेंद्र सोमाजी रायपुरे (वय ५३ वर्षे, रा. एसटी वर्कशॉप तुकुम, चंद्रपूर) याच्यासह शैलेश गंगाधर पोडल्लीवार (वय ५० वर्षे, रा. छत्रपती नगर, चंद्रपूर, शिक्षक), रंजु कालीदास दुर्योधन (वय ५४ वर्षे, रा. वैद्यनगर, चंद्रपूर, ऑटोचालक), इंद्रजीत सोमाजी रायपुरे (वय ५८ वर्षे, रा. तुकडोजी नगर, चंद्रपूर, मजुरी), राजेश्वर पोचम दुर्गे (वय ४८ वर्षे, रा. भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर, वेकोलि कर्मचारी), लतीत उर्फ क्षितीज बाकाराम देशपांडे (वय ४८ वर्षे, रा. छत्रपती नगर, चंद्रपूर, खाजगी नोकरी), अनिल यशवंत बनकर (वय ६५ वर्षे, रा. सिनाळा, चंद्रपूर, सेवानिवृत्त वेकोलि), किशोर वसंता पारखी (वय ४९ वर्षे, रा. इंदिरानगर, चंद्रपूर, वेकोलि कर्मचारी), सुनिल रामचंद्र नगराळे (वय ६३ वर्षे, रा. एसबीआय कॉलनी, चंद्रपूर, सेवानिवृत्त वेकोलि), संजु खुशाल दुर्योधन (वय ३८ वर्षे, रा. शक्तीनगर, दुर्गापूर, चंद्रपूर, वेकोलि कर्मचारी) आणि विजय गजानन रायपुरे (वय ५५ वर्षे, रा. समता कॉलनी, चंद्रपूर, वेकोलि कर्मचारी) या ११ जणांना जुगार खेळताना रंगेहात अटक केली. आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण १२,०६,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद
विशेष म्हणजे, हा अवैध जुगारअड्डा मागील अनेक महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा परिसरात होती. या प्रकरणी पकडण्यात आलेल्या सर्व ११ आरोपींविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४ आणि ५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काककडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे व त्यांच्या शोध पथकातील अंमलदारांनी पार पाडली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







2 thoughts on “शिक्षक व वेकोलि कर्मचाऱ्यांचा चंद्रपुरात रंगला जुगार”