चंद्रपूर : चंद्रपूर एमडी ड्रग्ज प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. जमनजेट्टी परिसरात २१ ऑक्टोबर रोजी ही कारवाई झाली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, त्याच्याकडून ६.७३० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त झाली. एकूण मुद्देमाल ४२,३१० रुपयांचा आहे. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने साठा नागपूरहून आणल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले असून, तपास सुरू आहे. (शिक्षक व वेकोलि कर्मचाऱ्यांचा चंद्रपुरात रंगला जुगार, वाचा बातमी)
युवा पिढीला अंमली पदार्थांच्या घातक विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि अवैध व्यवसायांवर कडक अंकुश ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध विशेष मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूरच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचून चंद्रपूर शहरातील हनुमान मंदिरासमोर, एम.ई.सी.बी. ऑफिस जवळ, जमनजेट्टी परिसरात एका सराईत ड्रग्ज विक्रेत्याला रंगेहात अटक केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज पावडर, मोबाईल फोन आणि रोख रक्कमेसह एकूण ४२,३१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चंद्रपूर एमडी ड्रग्ज प्रकरण : पोलिसांना कशी माहिती मिळाली?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर परिसरात पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की, रामाळा तलाव परिसरातील एक इसम एम.डी. ड्रग्ज पावडरची विक्री करण्याच्या हेतूने जमनजेट्टी परिसरात येणार आहे. मिळालेल्या गुप्त बातमीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ हालचाली सुरू केल्या.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठरलेल्या ठिकाणी रणनीतिक सापळा रचला. बातमीदाराने दिलेल्या वर्णनानुसार पांढऱ्या रंगाचा तपकिरी टिपके असलेला फुल बाह्यांचा शर्ट आणि काळी फुल पॅन्ट घातलेला एक संशयित इसम येताना दिसताच, पोलिसांनी त्याला चारी बाजूंनी घेराव घालून ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपले नाव शानवाज उर्फ शानू इस्माईल शेख (वय २८ वर्षे, रा. अहेमदीया मस्जीद जवळ, रामाळा तलाव, चंद्रपूर) असे सांगितले.
NDPS कायद्यान्वये गुन्हा; तपास सुरू
त्यानंतर एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्याच्या तरतुदींचे तंतोतंत पालन करत, राजपत्रित अधिकारी, पंच आणि अधिकृत वजन-मापारी यांच्या समक्ष आरोपीची कायदेशीर अंगझडती घेण्यात आली. झडतीदरम्यान त्याच्या पॅन्टच्या खिशातून एका प्लॅस्टिक पन्नीमध्ये पांढऱ्या रंगाची एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज पावडर, ओपो ए-५ प्रो कंपनीचा वापरता मोबाईल आणि रोख रक्कम मिळून आली. अंमली पदार्थ टेस्टिंग किटद्वारे घटनास्थळीच तपासणी केली असता, ती पावडर घातक एम.डी. अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपीकडून ६.७३० ग्रॅम वजनाची एम.डी. ड्रग्ज पावडर (किंमत २०,१९० रुपये), २०,००० रुपयांचा मोबाईल आणि २,१२० रुपये रोख रक्कम असा एकूण ४२,३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक तपासात आरोपीने हा घातक ड्रग्ज साठा नागपूर येथून चंद्रपुरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे, ज्यामुळे या तस्करीत मोठे ‘नागपूर कनेक्शन’ असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथे आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) चे कलम ८ (क), २२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
ही यशस्वी आणि धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनिल गौरकार, तसेच पोलीस अंमलदार सतीश अवथरे, लालू यादव, इनाम खान, संदीप कांबळे, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार आणि सायबर पोलीस स्टेशनचे स.पो.उप.नि. मुजावर अली यांनी पार पाडली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “नागपुरातून एमडी चंद्रपुरात विक्रीसाठी दाखल, गुन्हे शाखेच्या कारवाईने बिंग फुटलं”