Chandrapur MD Drugs प्रकरणात रामनगर पोलिसांचा लॉजवर छापा

न्यायालयातून बाहेर पडताच पुन्हा ड्रग्ज विक्री; रामनगर पोलिसांच्या कारवाईत अकोला-तुकुम कनेक्शन उघड

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 30, 2026

चंद्रपूर: Chandrapur MD Drugs प्रकरणात रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत जिल्हा परिषद कार्यालयासमोरील एका लॉजवर मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत दोन अट्टल ड्रग्ज तस्करांना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २२.३२ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), चार मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. चौकशीत मिळालेल्या माहितीनंतर तुकुम परिसरातील आणखी एका संशयितालाही पोलिसांनी अटक केली असून संपूर्ण आंतरजिल्हा ड्रग्ज रॅकेटचा तपास सुरू आहे. (शासकीय कामाचे आमिष दाखवीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक)

शहरातील अंमली पदार्थांच्या (मादक पदार्थ) तस्करीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत रामनगर पोलिसांनी अत्यंत धडक कारवाई करत, जिल्हा परिषद कार्यालयासमोरील एका लॉजवर मध्यरात्री छापा टाकला. या छाप्यात दोन अट्टल ड्रग्ज तस्करांना रंगेहात अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २२.३२ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर, चार मोबाईल फोन, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि इतर साहित्यासह सुमारे १ लाख ६६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Chandrapur MD Drugs प्रकरणात मध्यरात्री पोलिसांचा छापा

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अकोला येथील दोन तरुण चंद्रपूर शहरात एमडी ड्रग्जच्या विक्रीसाठी आले असून ते जिल्हा परिषदेसमोरील एका लॉजमध्ये थांबले आहेत, अशी खात्रीशीर माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने रात्रीच्या सुमारास लॉजमधील संबंधित खोलीवर अचानक छापा टाकला. खोलीची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडे अंमली पदार्थ आणि वजन काटा मिळून आला. पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ४० वर्षीय अब्दुल राजिक अब्दुल रशीद आणि शेख मुस्तफा शेख रहीम कुरेशी अशी असून, दोघेही अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले. आरोपींनी सांगितले की, त्यांच्यावर यापूर्वीही दुर्गापूर पोलीस ठाण्यात एमडी ड्रग्ज तस्कराचा गुन्हा नोंद आहे. याच गुन्ह्याच्या न्यायालयीन सुनावणीसाठी ते सोमवारी चंद्रपूर जिल्हा न्यायालयात आले होते. सकाळी न्यायालयात हजेरी लावल्यानंतर ते बाहेर पडले, मात्र शहरातून परतण्याऐवजी पुन्हा ड्रग्ज विक्रीच्या तयारीत असतानाच रात्री रामनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

पुढील चौकशीत आरोपींनी कबूल केले की, ते चंद्रपूरमधील तुकुम परिसरातील मोहम्मद नासिर रियाज शेख नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून अकोल्यातून हा साठा घेऊन आले होते. तसेच नासिरला त्यांनी यातील सुमारे ५ ग्रॅम एमडी ड्रग्ज विकले देखील होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्परता दाखवत नासिर यालाही अटक केली आहे. या आंतरजिल्हा ड्रग्ज रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.

सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment