चंद्रपूर अंमली पदार्थ तपासणी मोहिमेत श्वान पथकासह पोलीस तपासणी करताना

चंद्रपुरात पोलिसांची अचानक धडक; हॉटेल, ढाबे आणि लॉजची श्वान पथकासह तपासणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 18, 2026

चंद्रपूर, दिनांक १७ नोव्हेंबर: चंद्रपूर अंमली पदार्थ तपासणी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी जिल्ह्यातील हॉटेल, ढाबे आणि लॉजची अचानक झडती घेतली. १६ नोव्हेंबर रोजी नागपूर-चंद्रपूर रोडसह घुग्गुस परिसरात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. प्रशिक्षित श्वान पथकाच्या मदतीने विविध ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली. या कारवाईत अंमली पदार्थ किंवा संशयास्पद साहित्य आढळले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. (जमिनीसाठी बहिणीच्या बनावट सह्यांचा वापर, वाचा बातमी)

नागपूर-चंद्रपूर रोडवर श्वान पथकासह तपासणी, चंद्रपूर अंमली पदार्थ तपासणी मोहीम

संपूर्ण भारतामध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे सर्वसामान्य जनतेवर आणि विशेषतः तरुण पिढीवर होणारे घातक परिणाम ही आज एक अत्यंत गंभीर समस्या बनली असून, एम.डी. (MD) ड्रग्ज, गांजा व इतर अंमली पदार्थांच्या तस्करीला व सेवनाला प्रभावीपणे आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलीस दल पूर्णपणे आक्रमक झाले आहे. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थ शोधण्याची एक विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत नागपूर-चंद्रपूर रोड परिसरासह जिल्ह्यातील विविध भागांतील हॉटेल्स, लॉजेस आणि ढाब्यांची अचानक (चंद्रपूर अंमली पदार्थ तपासणी) कसून तपासणी करण्यात आली.

घुग्गुसमध्ये हॉटेल, ढाबे आणि लॉजची झडती, चंद्रपूर अंमली पदार्थ तपासणी मोहीम

या विशेष मोहिमेचा भाग म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक श्री. आलाम, तसेच स्थानिक गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे व त्यांच्या पथकाने प्रशिक्षित पोलीस श्वान पथकाच्या (Dog Squad) मदतीने नागपूर-चंद्रपूर रोडवरील हॉटेल्स, लॉजेस, ढाबे व निर्जन स्थळांना अचानक भेट देऊन सखोल तपासणी केली.

या मोहिमेत, पोलीस स्टेशन घुग्गुस हद्दीतही परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक श्री. सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने श्वान पथकासह व्यापक तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत घुग्गुस पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल डाहुले, पोलीस अंमलदार रवींद्र शेंडे, तोताराम ठाकरे व पवन डाखरे यांच्या पथकाने जयस्वाल ढाबा, गोल्डी ढाबा, विठ्ठल लॉज, पिंटू ढाबा, केके लॉज आणि अनुज लॉज यांसारख्या प्रमुख ठिकाणांची कसून झडती घेतली. याशिवाय, जिल्ह्यातील इतर सर्व पोलीस स्टेशन हद्दीतही संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपापल्या क्षेत्रातील लॉजेस व ढाब्यांची तपासणी केली.

तपासणीत अंमली पदार्थ आढळले नाहीत, चंद्रपूर अंमली पदार्थ तपासणी मोहीम

सदर दोन्ही तपासणी मोहिमांदरम्यान कोणत्याही ठिकाणी अंमली पदार्थ, संशयास्पद व्यक्ती किंवा आक्षेपार्ह मालमत्ता आढळून आली नाही, त्यामुळे त्याबाबत रीतसर ‘निरंक (Nil) झडती पंचनामा’ तयार करण्यात आला आहे. यापूर्वीही बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आंध्र प्रदेशातून येणाऱ्या रेल्वेगाड्यांची प्रशिक्षित पोलीस श्वानाच्या साहाय्याने कसून तपासणी करण्यात आली होती. युवकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या अचानक व धडक तपासण्या (Surprise Visits) यापुढेही चंद्रपूर जिल्ह्यात नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, चंद्रपूर पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील व राज्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, पालकांनी स्वतः तसेच आपल्या मुला-मुलींना अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर ठेवावे, याच्या दुष्परिणामांबाबत जागरूक राहावे आणि एक सुदृढ व अंमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाला जास्तीत जास्त सहकार्य करावे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment