चंद्रपूर मानवी शीर प्रकरणाचा तपास करताना इंदिरा गांधी चौकात तैनात पोलीस..

चंद्रपुरातील इंदिरा गांधी चौकात मानवी शीर आढळले; चंद्रपूर शहरात खळबळ

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 18, 2026

चंद्रपूर | चंद्रपूर मानवी शीर प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातील पुतळ्याजवळ बुधवारी (१८ नोव्हेंबर) सकाळी मानवी शीर आढळले. पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेत इरोज लॉन, रेल्वे पूलजवळील पडक्या होर्डिंगजवळ विनाशिराचे धड सापडले. रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा याचा तपास करीत आहे. (चंद्रपुरात धाबे, लॉज व हॉटेलवर पोलिसांची तपासणी मोहीम, वाचा बातमी)

इंदिरा गांधी चौकात नेमके काय घडले?, चंद्रपूर मानवी शीर

चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती आणि नेहमीच गजबजलेल्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातील पुतळ्याजवळ आज (दि. १८ नोव्हेंबर) सकाळच्या सुमारास मानवी शीर आढळून आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. शहराच्या भरचौकात अशा प्रकारे शीर आढळल्याने “क्रूरतेने हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली की काय?” अशी चर्चा वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली.

काय आहे नेमकी घटना? सकाळी नागरिकांच्या निदर्शनास इंदिरा गांधी पुतळ्याजवळ मानवी शीर पडल्याचे दिसताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून शिराची प्राथमिक पाहणी केली असता, ते १ ते २ दिवसांपूर्वीचे असल्याचा अंदाज आहे.

श्वान पथकाने शोधले ‘धड’ शीर तर सापडले, मात्र धड कुठे? या प्रश्नाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला (Dog Squad) पाचारण केले. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता, इरोज लॉन जवळील एका विशालकाय पडक्या होर्डिंगजवळ विनाशिराचे धड आढळून आले. सापडलेले शीर आणि हे धड एकाच व्यक्तीचे असल्याची खात्री पोलीस करीत आहे.

मृतकाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान मृतदेह १ ते २ दिवस जुना असल्याने त्याला तीव्र दुर्गंधी सुटली आहे. तसेच चेहरा विद्रूप झाल्याने मृतकाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, इरोज लॉनजवळ पडलेल्या मृतदेहाचे शीर भटक्या कुत्र्यांनी ओढत इंदिरा गांधी चौकापर्यंत आणले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सदर व्यक्ती नेमकी कोण आहे? ती इरोज लॉन परिसरातील त्या पडक्या होर्डिंगजवळ कशी पोहोचली? हा घातपात (हत्या) आहे की नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर प्राण्यांनी मृतदेहाचे लचके तोडले? या सर्व दिशांनी रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला आहे. शहरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासण्याचे कामही पोलिसांनी हाती घेतले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

2 thoughts on “चंद्रपुरातील इंदिरा गांधी चौकात मानवी शीर आढळले; चंद्रपूर शहरात खळबळ”

Leave a Comment