चंद्रपूर : चंद्रपूर बालसुधारगृह मुली – शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील बालसुधारगृहातून पळालेल्या सहा अल्पवयीन मुलींना रामनगर पोलिसांनी हिंगणघाट येथून ताब्यात घेतले. ही घटना १९ नोव्हेंबरला सायंकाळी घडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, तांत्रिक तपास, ३५ सीसीटीव्हीचे फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे २० नोव्हेंबरच्या पहाटे मुलींचा ठावठिकाणा समजला. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिसांनी यात सहकार्य केले. (रस्ता ओलांडणाऱ्या वाघाला वाहनांची धडक, वाघ जखमी, सविस्तर वाचा)
चंद्रपूर बालसुधारगृह मुली, पलायनाची घटना
शहरातील अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन्स परिसरातील बालसुधारगृहातून सहा अल्पवयीन मुलींनी नाट्यमय पद्धतीने पलायन केल्याची खळबळजनक घटना १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी घडली. काचेचा ग्लास फोडून त्याचा अणकुचीदार तुकडा हातात घेत सुरक्षा रक्षकाला मारण्याची धमकी देत या मुलींनी भिंतीवरून उडी मारून पोबारा केला होता. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून रामनगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, ३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज, गोपनीय खबऱ्यांचे जाळे आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिसांच्या समन्वयातून अवघ्या काही तासांत या सहाही मुलींचा शोध घेऊन त्यांना २० नोव्हेंबर रोजी पहाटे सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
सुरक्षा रक्षकावर हल्ला, चंद्रपूर बालसुधारगृह मुली
घटनेचा तपशील असा की, १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.२० वाजण्याच्या सुमारास सिव्हिल लाईन्स येथील बालसुधारगृहात समुपदेशनासाठी दाखल असलेल्या अल्पवयीन मुलींपैकी एका मुलीने अचानक काचेचा ग्लास फोडला. तिने काचेचा तुकडा हातात उगारून जवळ येणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर या मुलीसह इतर पाच अल्पवयीन मुलींनी बालसुधारगृहाच्या भिंतीवरून उडी मारून पळ काढला. या प्रकारानंतर बालसुधारगृहात एकच खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासातून शोध, चंद्रपूर बालसुधारगृह मुली
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. मुलींचा तातडीने शोध घेण्यासाठी सहा स्वतंत्र पोलीस पथके स्थापन करून त्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभवती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकांनी शहराच्या विविध भागांत समांतर शोधमोहीम राबविली.
पोलिसांनी केवळ एकाच दिशेने तपास न करता सर्व बाजूंनी मोहीम गतिमान केली. चंद्रपूर शहरातील तब्बल ३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज खंगाळून मुलींच्या पलायनाच्या मार्गाचा आणि हालचालींचा मागोवा घेण्यात आला. घटनास्थळ परिसर तसेच संभाव्य मार्गावरील प्रत्यक्षदर्शी व साक्षीदारांची सखोल चौकशी करून माहिती गोळा करण्यात आली. रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असलेली ठिकाणे पिंजून काढण्यात आली. त्याचबरोबर शहर व परिसरातील निर्जनस्थळे, मंदिरे, नदीकाठ आणि नदी परिसरातही प्रत्यक्ष जाऊन कसून शोध घेण्यात आला.
चंद्रपूर बालसुधारगृह मुली, डिजिटल पुरावे
दुसरीकडे, तपासाला अधिक धार देण्यासाठी डिजिटल पुरावे आणि तांत्रिक माहितीचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक पुराव्यांचा मेळ घालून मुलींच्या संभाव्य ठावठिकाण्याचा अंदाज बांधण्यात आला. अखेर २० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सहाही अल्पवयीन मुली वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे असल्याचे स्पष्ट झाले.
हिंगणघाटमध्ये ठावठिकाणा निश्चित, चंद्रपूर बालसुधारगृह मुली
ठावठिकाणा निश्चित होताच तातडीने हिंगणघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील नाईक यांना माहिती देण्यात आली. त्यांनी हिंगणघाट पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल राऊत यांच्याशी संपर्क साधून शोधकार्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. रामनगर येथून दोन विशेष पोलीस पथके हिंगणघाटकडे रवाना करण्यात आली आणि स्थानिक पोलिसांना आगाऊ माहिती देऊन सापळा रचण्यात आला. हिंगणघाट पोलिसांची मदत आणि महिला पोलीस अंमलदारांच्या सहकार्याने हिंगणघाट रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर सहाही मुलींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित ताब्यात घेण्यात आले व पुढील कारवाईसाठी चंद्रपूर येथे आणण्यात आले.
शोधमोहिमेत सहभागी अधिकारी, चंद्रपूर बालसुधारगृह मुली
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या शोधमोहिमेत रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, हनुमान उगले, शरद भस्मे, रमेश नन्नावरे, अश्विनी वाकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक कैलास खोब्रागडे, कृष्णा दराडे, सौरभ साळुखे यांच्यासह अंमलदार नितीन पेढाळकर,
ललित जांभुळकर, आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनीषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदीप गेडाम, राजू चिताडे, सूरज शेडमाके, ब्ल्यूटी साखरे आणि सायबरचे उमेश रोडे यांनी सहभाग नोंदविला. तसेच हिंगणघाट पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल राऊत, उपनिरीक्षक प्रवीण नगराळे, अंमलदार राजेश शेंडे, अंगेश्वर चौधरी, निलेश नुग्गुरवार, अमोल विगते तसेच महिला अंमलदार शामली बनसोड व अपर्णा डांगरे यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






