सावली – सावली नरभक्षक वाघ T-122 ला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सामदा परिसरात विशेष मोहीम सुरू केली आहे. व्याहाड उपवनक्षेत्रातील सामदा, निलसनी, पेडगाव, सोनापूर आणि वाघोली-बुटी भागात या वाघाची दहशत आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, महिनाभरात तीन गुराख्यांचा मृत्यू झाला आहे. वाघाला पकडण्यासाठी ३० बाय ३० फुटांचा पिंजरा बसवण्यात आला आहे. त्यावर सौर ऊर्जेवरील सीसीटीव्हीची नजर आहे. परिसरात २० ट्रॅप कॅमेरे आणि ५० ते ६० कर्मचारी तैनात आहेत. ग्रामस्थांनी जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (रावण दहन बंदीची मागणी, वाचा हि बातमी)
सावली नरभक्षक वाघाची दहशत; महिनाभरात तीन बळी
सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा सामदा, निलसनी, पेडगाव, सोनापूर आणि वाघोली-बुटी परिसरात मागील महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि मानवांवर हल्ले करणाऱ्या T-122 या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने विशेष मोहीम उघडली आहे. मानवी अस्तित्वाची चाहूल लागताच हुलकावणी देणाऱ्या या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने ३० बाय ३० फूट आकाराचा हायटेक आणि भव्य पिंजरा तैनात केला असून परिसरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.
मागील महिनाभरात जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या तीन गुराख्यांचा या T-122 वाघाने बळी घेतला आहे. या लागोपाठ झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे सामदा परिसरासह लगतच्या संपूर्ण ग्रामीण भागात शेतकरी, गुराखी व ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने २७ सप्टेंबर २०२६ पासून या वाघाला पकडण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे.
सामदा क्षेत्रात ३० बाय ३० फुटांचा पिंजरा
वाघाला शोधणे, त्याचा मागोवा घेणे आणि त्याला बेशुद्धीचे औषध देऊन जेरबंद करणे ही प्रक्रिया अत्यंत किचकट, वेळखाऊ आणि वन्यजीवासाठीही त्रासदायक असते. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी चंद्रपूर वनविभागाने एक अभिनव प्रयोग राबवला आहे. चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक श्री. रामानुजम यांच्या नेतृत्वात आणि विभागीय वन अधिकारी श्री. राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. घनश्याम नायगमकर आणि ब्रम्हपुरी वनविभागाचे जीवशास्त्रज्ञ श्री. राकेश आहुजा यांच्या संकल्पनेतून ३० फूट x ३० फूट आकाराचा विशेष पिंजरा तयार करण्यात आला आहे. हा हायटेक पिंजरा सावली परिक्षेत्रातील सामदा क्षेत्रात बसवण्यात आला आहे. या पिंजऱ्याच्या आत आमिष म्हणून प्राणी ठेवण्यात आला असून, त्यावर २४ तास नजर ठेवण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
सदर मोहीम सहाय्यक वनसंरक्षक श्री. विकास तरसे आणि सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. विनोद धुर्वे यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली राबवली जात आहे. वाघाच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने ९ सीसीटीव्ही गरुडा कॅमेरे, २० ट्रॅप कॅमेरे आणि ३ लाईव्ह कॅमेरे तैनात केले आहेत. तसेच एसटीपीएफ (STPF) पथक, आरआरयू (RRU) पथक, पीआरटी (PRT) चमू आणि सुमारे ५० ते ६० वनकर्मचारी व वनमजूर २४ तास अहोरात्र पाळत ठेवून आहेत.
या मोहिमेत इको प्रो चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष श्री. बंडू भाऊ धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक श्री. मुकेश भांदककर, जीवशास्त्रज्ञ श्री. अक्षय नारनवरे, सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त डॉ. छोनकर, क्षेत्र सहाय्यक श्री. मारुती पुल्लेवाड यांच्यासह स्थानिक वनरक्षक श्री. इंगळे, श्री. शेडमाके, श्री. डांगे, श्री. खुडे, श्री. अक्षय मेश्राम, श्री. नंदकिशोर चणकापुरे आणि श्री. लंकेश आखाडे हे सक्रियपणे सहभागी झाले आहेत.
वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या या संयुक्त कारवाईत लवकरच यश मिळण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. वाघ पूर्णपणे जेरबंद होईपर्यंत नागरिकांनी जंगल परिसरात जाणे टाळावे आणि वनविभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







2 thoughts on “वाघाला पकडण्यासाठी ३० बाय ३० फुटांचा पिंजरा; तीन बळींनंतर वनविभागाची मोहीम”