सावली तालुक्यातील Sawali Tiger Attack घटनेनंतर आ. वडेट्टीवार यांनी वनविभागाला दिलेला इशारा

सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, वडेट्टीवार यांचा वनविभागाला इशारा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 23, 2026

चंद्रपूर – Sawali Tiger Attack प्रकरणी विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सावली वनपरिक्षेत्रातील निलसनी-पेठगाव परिसरात गुरे चारताना एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला, तर २१ सप्टेंबर रोजी सामदा बुज परिसरात हेमंत अशोक भुरसे या शेतकऱ्याचाही अशाच हल्ल्यात बळी गेला. सलग होणाऱ्या या घटनांमुळे जंगलालगतच्या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वडेट्टीवार यांनी नरभक्षी वाघाचा तातडीने बंदोबस्त न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा वनविभागाला दिला आहे. (वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ३१ वा बळी, वाचा हि बातमी)

Sawali Tiger Attack: सावली तालुक्यात नेमकं काय घडलं?

सावली वनपरिक्षेत्रातील निलसनी-पेठगाव परिसरात काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. गुरे चारताना झालेल्या या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असतानाच २१ सप्टेंबर रोजी सामदा बुज परिसरात हेमंत अशोक भुरसे या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली.

निलसनी-पेठगाव व सामदा बुज येथील हल्ल्यांचा घटनाक्रम

एका पाठोपाठ एक जीव जात असताना वनविभाग नेमके काय करत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शेतकरी, गुराखी, शेतमजूर आणि जंगलालगतच्या गावांतील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
“नागरिकांनी शेती करायची कशी? गुरे चारायची कुठे? कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? प्रत्येक वेळी वनविभागाने केवळ गस्त वाढवली असे सांगून प्रश्न सुटणार आहे का?” असा सवाल आ. वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. तर सावली तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांचा शेती आणि जंगलाशी दररोजचा संबंध आहे. खरीप हंगामातील कामे सुरू असताना शेतकऱ्यांना शेतात जाणे अपरिहार्य आहे. मात्र वाघाच्या दहशतीमुळे शेतात जाण्यापूर्वीच कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकत आहे.

गुरे चारण्यासाठी गेलेल्या नागरिकांवरच हल्ले होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “शेतकऱ्याला आपल्या शेतात जाण्याची भीती वाटत असेल तर ही सामान्य परिस्थिती नाही,” अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. घटना घडल्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचतात, पंचनामा केला जातो आणि गस्त वाढविण्याची माहिती दिली जाते. मात्र नागरिकांचा मूलभूत प्रश्न कायम आहे—वाघाचा धोका कमी करण्यासाठी ठोस आणि कायदेशीर उपाययोजना कधी होणार? असा स्वभावही त्यांनी उपस्थित केला आहे.

वन्यजीवांचे संरक्षण करण्यास विरोध नाही. मात्र जंगलाच्या सीमेवर राहणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करणे हीदेखील शासनाची जबाबदारी आहे, असे आ. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
“वन्यजीव संरक्षणाच्या नावाखाली माणसांच्या जीवाची किंमत शून्य करता येणार नाही. नागरिकांचा जीव धोक्यात असताना प्रशासनाने कागदी अहवाल, सूचना आणि बैठकींपलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे,” असा आक्रमक सूर त्यांनी व्यक्त केला.

प्रशासनाने “जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. आणखी एखादा निष्पाप जीव जाण्याची वाट पाहू नका. सावली तालुक्यातील नागरिकांच्या जीविताची जबाबदारी शासनाने स्वीकारावी. तातडीने ठोस उपाययोजना न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू आणि तीव्र जनआंदोलन उभारू,” असा स्पष्ट इशारा आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment