चंद्रपुरात Chandrapur Ganesh Visarjan Traffic अधिसूचनेनुसार बंद असलेला प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट मार्ग

चंद्रपुरात २५ सप्टेंबरला गणेश विसर्जन मिरवणूक, मुख्य मार्ग बंद व पार्किंगमध्ये बदल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 23, 2026

चंद्रपूर – Chandrapur Ganesh Visarjan Traffic संदर्भात पोलीस प्रशासनाने महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. शहरात येत्या २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ३३(१)(ब) अन्वये विशेष सूचना लागू केली आहे. ही अधिसूचना २५ सप्टेंबर सकाळी ६ वाजतापासून २६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहणार असून, प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट या मुख्य मिरवणूक मार्गावर सर्व वाहनांना पूर्णपणे बंदी असेल. नागरिकांसाठी पर्यायी मार्ग व अधिकृत पार्किंग स्थळेही जाहीर करण्यात आली आहेत. (सकाळी भद्रावती मध्ये रक्ताचा सडा, वाचा हत्येची थरारक बातमी)

Chandrapur Ganesh Visarjan Traffic: पोलीस अधिसूचना काय सांगते?

या अधिसूचनेनुसार शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग असलेला प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट, कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक, जटपुरा गेट मार्गे रामनगर रोड आणि तेथून संत केवलराम चौक ते इरई नदीवरील रामसेतू पुलापर्यंतचा संपूर्ण रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक सुळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची सोय करण्यात आली असून, नागपूरकडून येऊन बल्लारशा किंवा मूलकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रियदर्शनी चौकाकडे जाण्यास बंदी असेल. ही वाहने वरोरा नाका उड्डाणपूल, सावरकर चौक ते बंगाली कॅम्प मार्गे पुढे पाठवली जातील. तसेच मूल किंवा बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी वाहनेदेखील बंगाली कॅम्प, सावरकर चौक व वरोरा नाका नवीन उड्डाणपुलावरून नागपूरकडे मार्गस्थ होतील.

नागपूरकडून शहरात प्रवेश करणाऱ्या हलक्या वाहनांना छोटा नागपूर, दाताळा चौक, देवाळा गाव व चोराळा टी-पॉइंटवरून बिनबा गेट किंवा पठाणपुरा गेटमार्गे प्रवेश दिला जाईल. याशिवाय, स्थानिक रहिवाशांना नागपूर, वणी, घुग्घुस किंवा गडचांदूरकडे जाण्यासाठी रहमत नगर, नगीना बाग या परिसरातून बिनबा गेट आणि चोराळा-दाताळा मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तर बल्लारशा व मूलकडून येणाऱ्या वाहनांना बस स्थानक, एलआयसी ऑफिस, बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातून तसेच प्रसन्न पेट्रोल पंपाकडून बाबूपेठ मार्गे केवळ अंचलेश्वर गेटपर्यंतच शहरात प्रवेश करता येईल.

मुख्य मिरवणूक मार्गावर कोणते रस्ते पूर्ण बंद राहणार?

गर्दीच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी शहरातील मुख्य मार्गांवर ‘नो पार्किंग’ आणि ‘नो हॉकर्स झोन’ घोषित केले आहेत. यात जटपुरा गेट ते कस्तुरबा चौक, जटपुरा गेट ते रामनगर रोड मार्गे रामसेतू पूल, जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक, कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेट, कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेट, गांधी चौक ते मिलन चौक ते जोड देऊळ, कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक, दस्तगीर चौक ते मिलन चौक, मिलन चौक ते बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, हिंदी सिटी हायस्कूल ते रघुवंशी कॉम्प्लेक्स, मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीज आणि छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदिर या परिसरांचा समावेश आहे. या मार्गांवर नागरिकांना, व्यावसायिकांना व गणेश भक्तांना वाहने उभी करण्यास अथवा विक्रेत्यांना स्टॉल लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मुख्य मिरवणूक मार्गावर राहणाऱ्या रहिवाशांकडे स्वतःची पार्किंग नसल्यास ते आपली वाहने जुबली हायस्कूलचे पटांगण किंवा महानगरपालिकेच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये उभी करू शकतात; मात्र ही वाहने मिरवणूक संपल्यानंतरच तेथून काढता येतील.

बाहरून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी अधिकृत पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये चांदा क्लब ग्राउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज (वरोरा नाका), सेंट मायकल हायस्कूल (नगीना बाग), सिंधी पंचायत भवन (संत केवलराम चौकाजवळ, रामनगर), व्यायाम शाळा ग्राउंड (पठाणपुरा चौक), डी.एड. कॉलेज ग्राउंड (बाबूपेठ) आणि महाकाली मंदिर ग्राउंड या ठिकाणांचा समावेश आहे. नागरिकांनी आपली वाहने शहरात न आणता या पार्किंग स्थळांवरच पार्क करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गणेशोत्सव मंडळांनी त्यांना नेमून दिलेल्या मिरवणूक क्रमांकाचे तंतोतंत पालन करावे आणि सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment