चंद्रपूर उत्सव निर्बंध अंतर्गत लेझर आणि डीजेवरील नियम

चंद्रपूरमध्ये उत्सवांवर निर्बंध; लेझर, मॉडीफाईड डीजेवर बंदी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 30, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर उत्सव निर्बंध आगामी गणपती, नवरात्र, दांडिया, दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आले आहेत. कायदा, सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता राखण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी विशेष आदेश जारी केले आहेत. २९ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्रीपासून ३० ऑक्टोबर २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश जिल्ह्यात लागू राहतील. मिरवणुकांमध्ये लेझर आणि तीव्र प्रकाशयंत्रांवर बंदी घालण्यात आली आहे. ध्वनिक्षेपक, डीजे आणि इतर ध्वनीयंत्रांसाठीही नियम निश्चित करण्यात आले आहेत. (चंद्रपुरात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, वाचा हि दुर्दैवी घटनेची बातमी)

चंद्रपूर उत्सव निर्बंध ३० ऑक्टोबरपर्यंत लागू

आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या विविध धार्मिक व सार्वजनिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था व सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मस्कऱ्या गणपती स्थापना व विसर्जन, नवरात्र उत्सव, दांडिया, दसरा तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका आणि कार्यक्रमांदरम्यान नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे याकरिता चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३६ आणि कलम ३८(१) अन्वये विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश २९ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्री १२.०० वाजेपासून ते ३० ऑक्टोबर २०२६ च्या रात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहेत.

मिरवणुकांमध्ये लेझर आणि तीव्र प्रकाशावर बंदी

पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या या आदेशानुसार मिरवणुकीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या लेझर लाईट, तीव्र तीव्रतेचे फ्लॅश लाईट आणि मानवी डोळ्यांवर तसेच आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रकाश यंत्रणांच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पोलीस अधिकारी किंवा सक्षम प्राधिकारी मिरवणुकीतील लाईट उपकरणांची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी करू शकतील आणि अशी उपकरणे धोकादायक आढळल्यास ती तात्काळ बंद करण्याचे निर्देश देतील. याशिवाय ध्वनिवर्धक आणि लाउडस्पिकरच्या वापराबाबतही कठोर नियमावली लागू करण्यात आली असून सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक किंवा अँप्लीफायरचा वापर करता येणार नाही. अत्यंत तीव्र व हानीकारक ध्वनी निर्माण करणाऱ्या डी.जे., प्लाझ्मा सिस्टीम, मॉडीफाईड साउंड इक्विपमेंट, वुफर आणि सबवुफर यांसारख्या उपकरणांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी डेसिबलची मर्यादा

नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता परिसरनिहाय ध्वनी तीव्रतेची मर्यादा (डेसिबल) निश्चित करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी दिवसा ७५ डेसिबल व रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रासाठी दिवसा ६५ डेसिबल व रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रासाठी दिवसा ५५ डेसिबल व रात्री ४५ डेसिबल तर रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये यांसारख्या सायलंस झोन म्हणजेच शांतता क्षेत्र परिसरात दिवसा ५० डेसिबल व रात्री ४० डेसिबल अशी मर्यादा आखून देण्यात आली आहे. या शांतता क्षेत्रात ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सूट दिलेले दिवस आणि वेळ वगळता इतर दिवशी रात्री १०.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व डी.जे. वापरण्यास पूर्णपणे बंदी असेल.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाकडून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नियम मोडल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ७० अन्वये संबंधित ध्वनी व प्रकाश यंत्रणा किंवा उपकरणे जप्त केली जातील. तसेच उत्सव आयोजक, डी.जे. ऑपरेटर किंवा वाहन चालक यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ७२(२) अन्वये वारंटशिवाय अटकेची कारवाई केली जाऊ शकते, तसेच कलम १३४ व १३६ अन्वये न्यायालयात खटला दाखल केला जाईल. आगामी सर्व सण व उत्सव शांततापूर्ण वातावरणात, सुरक्षिततेने व उत्साहात साजरे व्हावेत यासाठी सर्व नागरिक, उत्सव मंडळे आणि आयोजकांनी पोलीस प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment