चंद्रपूर: Chandrapur DJ Laser Ban संदर्भात पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात अत्यंत कडक पावले उचलली आहेत. आगामी पोळा आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक शांतता व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी हे विशेष मनाई आदेश जारी केले आहेत. ५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत हा नियम लागू राहणार आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात सेतू केंद्र चालक एसीबीच्या सापळ्यात)
जिल्ह्यात आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये सार्वजनिक शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. सणांच्या काळात होणारा कानठळ्या बसवणारा आवाज आणि डोळ्यांना इजा पोहोचवणाऱ्या लेझर किरणांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३६ व ३८ (१) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात विशेष निर्बंध व मनाई आदेश लागू केले आहेत. हे आदेश ५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून ते २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्हाभरात अंमलात राहणार आहेत.
Chandrapur DJ Laser Ban : पोलीस प्रशासनाचे कडक मनाई आदेश
उत्सव मिरवणुकीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या लेझर लाईट्स, अति तीव्रतेचे फ्लॅश लाईट्स आणि मानवी डोळ्यांवर तसेच आरोग्यावर गंभीर विपरीत परिणाम करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रकाश यंत्रणांच्या वापरावर कलम ३६ अन्वये पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या अशा प्रकाश उपकरणांची पोलीस अधिकारी किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत थेट तपासणी केली जाणार असून, मानवी आरोग्यास धोकादायक आढळणारी उपकरणे जागीच बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे लाऊडस्पीकर किंवा ॲम्प्लीफायर वाजवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. डी.जे., प्लाझ्मा सिस्टीम, मॉडिफाइड साऊंड इक्विपमेंट, वुफर आणि सब-वुफर यांसारख्या कानठळ्या बसवणाऱ्या व आरोग्यासाठी घातक असणाऱ्या ध्वनियंत्रणांवर कलम ३८ (१) अंतर्गत पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्यास मनाई
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सूट दिलेले विशिष्ट दिवस आणि वेळ वगळता दररोज रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व डी.जे. वाजवण्यावर पूर्ण बंदी असेल. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये यांसारख्या घोषित शांतता क्षेत्रात (सायलेन्स झोन) ध्वनी मर्यादेचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. प्रशासनाने निश्चित केलेल्या मर्यादेनुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ तर रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ तर रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ तर रात्री ४५ डेसिबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्री ४० डेसिबल आवाजाची कमाल मर्यादा निश्चित केली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देताना पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आदेशाचा भंग झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ७० अन्वये संबंधित सर्व ध्वनी व प्रकाश यंत्रणा जागेवरच जप्त केल्या जातील. इतकेच नव्हे तर कलम ७२ (२) अंतर्गत संबंधित उत्सव मंडळाचे आयोजक, डी.जे. ऑपरेटर किंवा वाहन चालकास कोणत्याही वॉरंटशिवाय थेट अटक केली जाईल तसेच कलम १३४ आणि १३६ अन्वये न्यायालयात खटले दाखल करण्यात येतील. सण-उत्सवाचा आनंद शांततापूर्ण व सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी सर्व नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि आयोजकांनी या नियमांचे तंतोतंत पालन करून पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






