चंद्रपूर: Gadchandur ACB Trap Action मोहिमेत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. दाखल्यासाठी जादा पैसे घेणाऱ्या सेतू चालकाला रंगेहात पकडले आहे. गडचांदूर येथील त्रिशा ऑनलाईन सर्व्हिसेस केंद्राचा चालक सचिन खैरे याने लाच मागितली होती. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी त्याने शासकीय शुल्काव्यतिरिक्त जादा पैशांची मागणी केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला १५० रुपयांची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतले. या धडक कारवाईमुळे लाचखोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (हे हि वाचा – मोपेडवरून गांजा तस्करी करणाऱ्या महिलेला अटक)
Gadchandur ACB Trap Action : सेतू केंद्र चालक एसीबीच्या जाळ्यात
शासकीय कामांसाठी नागरिकांकडून अवाजवी पैशांची मागणी करून लाच लाटणाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कडक मोहीम उघडली असून, गडचांदूर येथे अशीच एक धडक कारवाई करण्यात आली आहे. उत्पन्नाचा दाखला काढून देण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त जादा पैशांची मागणी करणाऱ्या सरकारमान्य सेतू केंद्र चालकाला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. सचिन रामचंद्र खैरे (वय ४० वर्षे, रा. गडचांदूर वार्ड क्र. ३, ता. कोरपना, जि. चंद्रपूर) असे लाचेची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आलेल्या सेतू केंद्र चालकाचे नाव आहे. तो गडचांदूर येथील ‘त्रिशा ऑनलाईन सर्व्हिसेस’ हे सरकारमान्य सेतू केंद्र चालवतो.
उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ६९ रुपयांऐवजी मागितली लाच
या प्रकरणातील ५२ वर्षीय तक्रारदार नागरिकाला उत्पन्नाचा दाखला काढून हवा होता. त्यासाठी त्यांनी गडचांदूर येथील त्रिशा ऑनलाईन सर्व्हिसेस या सरकारमान्य सेतू केंद्रात संपर्क साधला. नियमानुसार उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ६९ रुपये इतके शासकीय शुल्क आकारले जाते. मात्र, सेतू केंद्र चालक सचिन खैरे याने तक्रारदाराकडे शासकीय शुल्कासह एकूण २०० रुपयांची मागणी केली. शासकीय शुल्काव्यतिरिक्त वरचे १३१ रुपये लाच म्हणून देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी या अन्यायाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयात जाऊन ७ सप्टेंबर २०२६ रोजी लेखी तक्रार नोंदवली.
तक्रारदाराची चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव
तक्रार दाखल झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ या प्रकरणाची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान तक्रारदार पंचांसह सेतू केंद्रात गेले असता, सचिन खैरे याने दाखल्यासाठी शासकीय शुल्कासह २०० रुपयांची मागणी कायम ठेवत तडजोडीअंती १५० रुपये स्वीकारण्याचे पंचांसमक्ष मान्य केले. लाचेची मागणी सिद्ध होताच एसीबीच्या पथकाने सेतू केंद्रात सापळा रचला. त्यानुसार तक्रारदाराने सचिन खैरे याला शासकीय शुल्काचे ६९ रुपये आणि लाचेची उर्वरित ८१ रुपये रक्कम असे एकूण १५० रुपये दिले असता, त्याने ही रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने त्याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले. या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्हा दाखल होताच आरोपीच्या अटकेची नोंद करण्यात येणार आहे.
सदरची यशस्वी कारवाई नागपूर ला.प्र.वि.चे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर चंद्रपूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक प्रशांत केदार यांनी सापळा पथकाचे नेतृत्व केले. या कारवाईत पोलीस हवालदार हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, पोलीस शिपाई अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, महिला पोलीस शिपाई मेघा मोहुर्ले, चालक पोलीस शिपाई सतीश सिडाम व संदीप कवरासे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शासकीय कामासाठी किंवा कोणत्याही दाखल्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त कोणीही लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न डगमगता एसीबीच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






