चंद्रपूर : Chandrapur Gen Z Fellowship सुरू करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेकडे महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. यामुळे शहरातील गुणवंत तरुणांना थेट प्रशासनाचा अनुभव मिळेल. स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. प्रा. निलेश बेलखेडे यांनी प्रशासनाला या उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले.
Chandrapur Gen Z Fellowship : उपक्रमाचे मूळ स्वरूप आणि उद्दिष्ट
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तरुणांच्या कल्पकतेचा उपयोग करणे हा यामागील मुख्य हेतू आहे. मनपाने यावर सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. (हे हि वाचा – १५० रुपयाची लाच मागणे भोवले, सेतू चालकांना एसीबी ने केली अटक)
चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘मनपा जेन झी फेलोशिप कार्यक्रम’ सुरू करून शहरातील गुणवंत व इच्छुक युवकांना महानगरपालिकेच्या प्रशासन, शहर विकास आणि लोकाभिमुख कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भात स्थानिक आमदार किशोर जोरगेवार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. निलेश र. बेलखेडे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त, महापौर तसेच स्थायी समिती अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले.
आजच्या ‘जेन झी’ पिढीची ऊर्जा शहर विकासासाठी कशी उपयुक्त ठरेल?
आजची ‘जेन झी’ पिढी ही तंत्रज्ञानस्नेही, कल्पक आणि नाविन्यपूर्ण विचार करणारी आहे. या युवकांच्या ज्ञानाचा व ऊर्जेचा उपयोग शहराच्या विकासासाठी करून घेण्यासाठी त्यांना महानगरपालिकेच्या विविध विभागांशी जोडणे आवश्यक आहे. फेलोशिपच्या माध्यमातून युवकांना प्रशासनाची कार्यपद्धती, शहर नियोजन, स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण, डिजिटल प्रशासन, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच नागरिकांच्या समस्या यांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
या उपक्रमातून युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित होण्यासोबतच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होण्यास मदत होईल. तसेच शहराच्या विविध प्रश्नांवर युवकांकडून नाविन्यपूर्ण उपाययोजना आणि कल्पना पुढे येऊ शकतील.
महानगरपालिकेने या मागणीचा सकारात्मक विचार करून पारदर्शक निवड प्रक्रिया, निश्चित कालावधी, प्रशिक्षण, प्रकल्पाधारित काम आणि फेलोशिप पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र अशा स्वरूपात ‘मनपा जेन झी फेलोशिप कार्यक्रम’ राबवावा, अशी मागणी सिनेट सदस्य, भाजपा युवा नेते प्रा. निलेश बेलखेडे यांनी केली.
चंद्रपूरच्या विकास प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वाचा ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी विद्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रलंय मशाखत्री, युवा मोर्चा महामंत्री सतीश तायडे, भाजपा युवा नेते, तेलगू आघाडी अध्यक्ष ओमेश आयलू, युवा नेते शिरीष गोगुलवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






