इरई धरण पाणीसाठा पाहणी करताना आमदार किशोर जोरगेवार आणि जिल्हाधिकारी

चंद्रपूरमध्ये पाणीटंचाई टाळायची कशी? आमदारांच्या सूचना

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 31, 2026

चंद्रपूर – इरई धरण पाणीसाठा आणि नियोजनाचा आढावा आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतला. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासह त्यांनी धरणाची पाहणी केली. दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा काटेकोर वापर व्हावा, अशी सूचना त्यांनी केली. शेवटच्या वस्तीपर्यंत पाणी पोहोचेल याची काळजी घेण्यास त्यांनी प्रशासनाला सांगितले. यावेळी मनपा आयुक्त नरेश अकुनरी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. पाण्याची उपलब्धता, संभाव्य गरज आणि वितरण नियोजन यावर चर्चा झाली. ही पाहणी चंद्रपूरमधील पाणीटंचाई टाळण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. (मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मजुरांना मिळाला दिलासा, वाचा बातमी)

इरई धरण पाणीसाठा: पाहणीत काय चर्चा झाली?

चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून त्याचा काटेकोर वापर करणे आवश्यक आहे. आगामी काळातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे. कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा अपव्यय होणार नाही. शेवटच्या नागरिकापर्यंत पाणी पोहोचेल, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासह त्यांनी इरई धरणाची पाहणी करून उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला.

          यावेळी मनपा आयुक्त नरेश अकुनरी, मुख्य अभियंता चंद्रपूर थर्मल पाँवर स्टेशन अनिल काथोये, उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, उपायुक्त मनपा शेषराव टाले, तहसीलदार विजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख, कार्यकारी अभियंता चंद्रपूर पाटबंधारे विभाग जलेश सिंग, कार्यकारी अभियंता महेश गवरी, शहर अभियंता मनपा रवींद्र हजारे यांच्यासह इतर अधिकार्यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी भाजपचे माजी महानगर अध्यक्ष तथा नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रकाश देवतळे, भाजपा महामंत्री नामदेव डाहुले, रविंद्र गुरनुले, मनोज पाल, गटनेते शेखर शेट्टी,  जितेश कुळमेथे, बलराम डोडानी, तुषार सोम, दशरथ सिंग ठाकूर, अमोल शेंडे, प्रलय म्हशाखेत्री, प्रवीण गिलबिले यांच्या सहा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

प्रशासनाला कोणत्या सूचना दिल्या?

    यावेळी धरणातील सद्यस्थितीतील पाणीसाठा, पाण्याची उपलब्धता, आगामी काळातील संभाव्य गरज आणि पाणी वितरणाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचे नियोजन करताना प्रत्येक बाबीचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. उपलब्ध पाणीसाठा किती दिवस पुरू शकेल, विविध क्षेत्रांसाठी किती पाण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार वितरण कसे करावे, याचे स्पष्ट नियोजन प्रशासनाने तयार करावे. पाणीपुरवठ्याच्या नियोजनात कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याच्या सूचना आमदार जोरगेवार यांनी यावेळी केल्या.

जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि बंधारे

   केवळ धरणातील उपलब्ध पाण्यावर अवलंबून न राहता इतर जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठीही विशेष प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्रोत असूनही योग्य देखभाल आणि संवर्धनाअभावी ते निष्क्रिय झाले आहेत. अशा जलस्रोतांची ओळख करून त्यांना पुन्हा प्रवाहित करण्यासाठी आवश्यक कामे हाती घ्यावीत. नद्या, नाले आणि ओढ्यांमधील पाणी अडवून त्याचा साठा वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अश्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे.

  जिल्ह्यात ज्या ठिकाणी बंधारे बांधणे शक्य आहे, त्या ठिकाणांची पाहणी करून बंधार्यांच्या उभारणीचे नियोजन करावे. शक्य तिथे बंधारा या भूमिकेतून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्याला प्राधान्य द्यावे. यामुळे भूजलपातळी वाढण्यास मदत होण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठीही हातभार लागेल. यासोबतच पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्यांमधील गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करावी. वितरण व्यवस्थेतील पाण्याचे नुकसान कमी करून उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक उपयोग नागरिकांसाठी करता येईल, अशा उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

  इरई धरणातून होणारी वीजनिर्मिती आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे वीजनिर्मिती प्रक्रियेला बाधा न आणता पिण्याच्या पाण्याच्या गरजेचा समतोल राखणारे नियोजन करण्यात यावे. यासाठी संबंधित विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून निर्णय घ्यावेत. पाणी वितरण करताना शेवटच्या टोकावरील वस्त्यांपर्यंत नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होईल, याची खबरदारी घ्यावी, असे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.

  दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने आतापासूनच आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. तात्पुरत्या उपाययोजनांसोबतच भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढविणार्या दीर्घकालीन कामांनाही गती द्यावी. पाणी अडविणे, पाण्याचे संवर्धन, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून कृती आराखडा तयार करावा. उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि सर्व विभागांमधील समन्वयातून जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलावीत, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment