बल्लारपूर डेपोतील लॉटिंग गँग मजुरी मिळाल्यानंतर मजूर

दिवाळीपूर्वी दिलासा; मुनगंटीवारांचा पुढाकार, बल्लारपूरच्या लॉटिंग गँग मजुरांना पाच महिन्यांची थकीत मजुरी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 31, 2026

चंद्रपूर – लॉटिंग गँग मजुरी थकल्याने बल्लारपूर येथील मजुरांना महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागली होती. आता ही थकीत रक्कम मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. बल्लारपूर येथील वाहतूक विपणन विभागाच्या डेपोत हे मजूर काम करतात. त्यांची एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांची मजुरी थकली होती. दसराही मजुरीविना गेल्याने दिवाळीबद्दल चिंता होती. भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे यांनी हा विषय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर मांडला. त्यानंतर शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. (ऐन दिवाळीत ट्रॅव्हल्स धारकांकडून प्रवाश्यांची लूट, अशी करा तक्रार, वाचा बातमी)

पाच महिने थकली होती लॉटिंग गँग मजुरी

दिवाळीचा सण प्रत्येकाच्या घरात आनंदाचा दीप उजळवणारा असतो; मात्र ज्या कष्टकरी हातांच्या घामावर संपूर्ण कुटुंबाचा संसार उभा असतो, त्याच हातांना आपल्या मेहनतीचा मोबदला मिळण्यासाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागणे, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. मजुरांच्या घरातील चिमुकल्यांच्या दिवाळीचा आनंद आर्थिक विवंचनेमुळे हिरावला जाऊ नये, त्यांच्या कष्टाचे मोल त्यांना सणासुदीच्या दिवसांत मिळावे, या संवेदनशील भावनेतून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथील लॉटिंग गँगच्या मजुरांच्या प्रश्नात तातडीने लक्ष घातले. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांची थकीत मजुरी मिळण्यासोबतच सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यांची मजुरीही उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली. त्यांच्या या पुढाकारामुळे मजुरांच्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेला विराम मिळाला असून, दिवाळीच्या उंबरठ्यावर त्यांच्या घरात आनंदाचा दिवा उजळण्यास मोठा आधार मिळाला आहे.

आंदोलनाच्या तयारीत असलेल्या मजुरांनी कोणाकडे मांडली अडचण?

बल्लारपूर येथील वाहतूक विपणन विभागांतर्गत डेपोमध्ये कार्यरत लॉटिंग गँगच्या मजुर मजुरी थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक विवंचनेचे सावट होते. दसऱ्यासारखा सणही मजुरीविना गेल्याने आता दिवाळी तरी अंधारात जाणार नाही ना, अशी मजुरांना चिंता भेडसावत होती.आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत असलेल्या मजुरांनी आपली अडचण भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे यांना सांगितली. श्री.दुबे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास ही बाब तात्काळ आणून दिली. मजुरांच्या कष्टाचा मोबदला हा त्यांचा हक्क आहे आणि त्यांच्या घरातील सणाचा आनंद हिरावला जाऊ नये, या संवेदनशील भूमिकेतून आ. मुनगंटीवार यांनी तातडीने पुढाकार घेतला.

वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून तसेच वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. खंदारे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीतील थकीत मजुरी तातडीने अदा करण्याची मागणी केली. एवढेच नव्हे, तर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांची मजुरीही वेळेत मिळावी, यासाठी आग्रही भूमिका मांडली. त्यांच्या या पुढाकारामुळे थकीत मजुरीची रक्कम शासनाकडून प्राप्त झाली असून, दिवाळीच्या उंबरठ्यावर मजुरांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

मजुरांच्या हाताला काम मिळणे जितके महत्त्वाचे, तितकाच त्यांच्या कष्टाचा मोबदला वेळेवर मिळणेही महत्त्वाचे आहे. कारण त्या मजुरीवरच त्यांच्या मुलांचे शिक्षण, घरातील चूल आणि कुटुंबाच्या छोट्या-मोठ्या गरजा अवलंबून असतात. सणासुदीच्या काळात हातात पैसे नसल्याने कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडू नये, याची जाणीव ठेवून आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नात लक्ष घातले. मजुरांच्या वेदनेची दखल घेत प्रशासकीय स्तरावर केलेल्या या हस्तक्षेपामुळे त्यांच्या कुटुंबांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळाला आहे. कष्टकऱ्यांच्या आयुष्यातील आनंदाचा दिवा तेवत राहावा, हीच या पुढाकारामागील भावना आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “दिवाळीपूर्वी दिलासा; मुनगंटीवारांचा पुढाकार, बल्लारपूरच्या लॉटिंग गँग मजुरांना पाच महिन्यांची थकीत मजुरी”

Leave a Comment