नागभीड : नागभीड हायवे अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेने एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना नागभीड-नागपूर महामार्गावर शुक्रवारी रात्री घडली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला. नागभीड पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्ती आंबेडकर वार्ड, नागभीड येथील रहिवासी होते. कुटुंबाच्या माहितीनुसार ते अनेक वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होते. पोलीस पुढील तपास करत आहेत. (२ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई, वाचा बातमी)
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-नागपूर महामार्गावर एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६० वर्षीय मनोरुग्ण वृद्ध जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून आपली गाडी घेऊन पसार झाला असून, या हिट अँड रनच्या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी नागभीड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागभीड हायवे अपघात: शुक्रवारी रात्री काय घडले?
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत वृद्ध व्यक्ती लक्ष्मण महादेव मरघडे (वय ६०, रा. आंबेडकर वार्ड, नागभीड) असे त्यांचे नाव असून ते गेल्या २० वर्षांपासून मनोरुग्ण होते. प्रकृती स्थिर नसल्यामुळे ते वारंवार घरून निघून जायचे आणि नागभीड गावातील मुख्य रस्त्यांवर किंवा परिसरात फिरत असायचे; तसेच ते बहुतांश वेळा बाहेरच कुठेही झोपत असत. कुटुंबीयांनी त्यांना बऱ्याचदा घरी आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते घरी थांबत नव्हते.
शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:०० ते ११:३० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण मरघडे हे नागभीड-नागपूर हायवेवरील आर.एम.जी. कॉलेज, नवखळा परिसरासमोर रस्त्यावर फिरत होते. दरम्यान, नागभीड ते नागपूर दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या चालकाने आपल्या हातातील वाहन अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे व हयगयीने चालवून रस्त्यावरून चाललेल्या लक्ष्मण मरघडे यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत वृद्धेच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. अपघात एवढा भीषण होता की, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, मात्र संतापजनक बाब म्हणजे अपघात घडल्यानंतर वाहन न थांबवता चालकाने घटनास्थळावरून वाहन पळवून नेले.
या घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत मृतदेह नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी व शवविच्छेदनासाठी दाखल केला. रात्री उशिरा पोलिसांनी मृताच्या मुलाला यानीच दीपक लक्ष्मण मरघडे (वय ३६) यांना संपर्क करून अपघाताची माहिती दिली व फोटो दाखवले असता, मृत व्यक्ती आपलेच वडील असल्याची ओळख पटली. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी फिर्यादी दीपक मरघडे यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून नागभीड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०६(१) (घाट सदोष मनुष्यवध नाही असा मृत्यू), २८१ तसेच मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १८४, १८७ आणि १३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य बंडू गोविंदलवार करत असून अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे कसून चौकशी करत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






