तळोधी टिप्पर चालक अटक प्रकरणात जप्त केलेला टिप्पर

बैलगाडीला धडक देणारा टिप्पर चालक अखेर ताब्यात

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 25, 2026

तळोधी: तळोधी टिप्पर चालक अटक प्रकरणात पोलिसांना १३ दिवसांनी यश मिळाले आहे. १० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे झालेल्या अपघातानंतर चालक टिप्परसह पळाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याला उमरेड परिसरातून जात असताना ताब्यात घेण्यात आले. या अपघातात नथ्थू चचाने (५५) यांच्या बैलगाडीला धडक बसली होती. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता तळोधी पोलिसांनी चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. टिप्पर जप्त करण्यात आला आहे. (कौटुंबिक वादात लहान भावाने मोठ्या भावाची केली हत्या, वाचा बातमी)

तळोधी टिप्पर चालक अटक: १० ऑक्टोबरच्या अपघाताचा तपास

तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात घडलेल्या भीषण अपघाता प्रकरणातील अज्ञात टिप्पर चालक आणि वाहन शोधून काढण्यात तळोधी पोलिसांना मोठे यश आले असून, अपघातानंतर तब्बल १३ दिवसांनी आरोपी चालक व टिप्पर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. गत १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास गोमाजी दामाजी पेट्रोल पंपाजवळ हायवेरोडवर नागभीडकडून विरुद्ध दिशेने भरधाव वेगात, हयगयीने व निष्काळजीपणे टिप्पर चालवून मालक नथ्थू श्रीराम चचाने यांच्या बैलगाडीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात नथ्थू श्रीराम चचाने (वय ५५ वर्षे, रा. तळोधी) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, तर बैलगाडीतील बैल जागीच मरण पावला होता. या अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार झाला होता आणि उपचारादरम्यान गंभीर जखमी नथ्थू चचाने यांचा मृत्यू झाला होता. फिर्यादी राजेंद्र रुषीजी कोडापे यांच्या तक्रारीवरून तळोधी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या तपासात वाहनाचा तांत्रिकदृष्ट्या शोध घेताना संभ्रम निर्माण होत असल्याने, तळोधी पोलिसांनी आपले तपास कौशल्य पणाला लावत तळोधी रोडने चालणारे अवजड वाहन कोणाचे व कोठून येतात, याबाबत गुप्त बातमीदाराकडून विनाक्रमांकाच्या टिप्परचा शोध सुरू केला. तपासादरम्यान सदर वाहन उमरेड जि. नागपूर येथे असताना भिवापूर रोडने मूलकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने, पोलिसांनी तात्काळ तिचा पाठलाग केला व पोलीस स्टेशनच्या वाहतूक कर्मचाऱ्यांना माहिती देऊन तळोधी रोडवर नाकाबंदी केली. यादरम्यान टिप्पर क्रमांक (MH 40 CD 4632) चालक सचिन दुर्योधन देशमुख (वय ३७ वर्षे, धंदा चालक, रा. सोमनाळा, पोस्ट मोकेर्बंडी, ता. भिवापूर, जि. नागपूर) याच्या ताब्यात मिळून आल्याने त्यास विचारपूस करण्यात आली.

विचारपूस दरम्यान आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेले टिप्पर जप्त करून पोलीस स्टेशनला डिटेन करण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनी राहुल गुहे, पोउपनि राजेश उंदिरवादे, पोहवा स्वप्नील चांदेकर, पोअ. संदेश देवगडे, विजय मैद आणि अक्षय हटवार यांनी पार पाडली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment