चंद्रपूर हत्या प्रकरणातील लुम्बिनी नगर परिसरातील पोलीस तपासाचे छायाचित्र.

‘टार्गेट’ चुकला, चंद्रपूरच्या लुम्बिनी नगरात २२ वर्षीय तरुणाची हत्या; ११ जणांना अटक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 29, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर हत्या प्रकरणात लुम्बिनी नगरातील २२ वर्षीय पृथ्वी माहूरकरच्या मृत्यूप्रकरणी ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. रामनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाने तपास केला. २८ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेमागे १ नोव्हेंबरच्या जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

चंद्रपूर हत्या प्रकरणात ११ आरोपींना अटक

शहरातील लुम्बिनी नगर परिसरात शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी घडलेल्या रक्तरंजित टोळीयुद्धात २२ वर्षीय पृथ्वी माहूरकर या तरुणाची तलवार आणि रॉडने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली, तर एका तरुणाला बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. या खळबळजनक प्रकरणी रामनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत एकूण ११ आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, मारेकऱ्यांचा खरा रोख भलत्याच युवकांवर होता; मात्र अचानक झालेल्या हल्ल्यात पृथ्वी त्यांच्या हाती लागल्याने त्याचा नाहक बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १ नोव्हेंबर रोजी झालेल्या जुन्या भांडणाची किनार या टोळीयुद्धाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (चंद्रपुरात २२ वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या, वाचा सविस्तर)

या घटनेची पार्श्वभूमी १ नोव्हेंबर रोजी घडलेल्या वादाशी जोडली गेली आहे. त्या दिवशी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आंबेडकर चौकातील बायपास मार्गावरील इस्राईल शेख यांच्या चिकन सेंटरसमोर पाच युवकांनी एका मुलासोबत वाद घातला होता. दुकानासमोर सुरू असलेला हा वाद मिटवण्यासाठी इस्राईल शेख पुढे सरसावले आणि त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘तू मध्ये का पडलास?’ असे म्हणत त्या पाच युवकांनी इस्राईललाच मारहाण केली. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवल्यानंतर इस्राईलने त्या वेळी पोलिसांत तक्रार दिली नव्हती. मात्र, दुसऱ्याच दिवशी २ नोव्हेंबर रोजी त्या युवकांच्या टोळक्याने इस्राईलच्या घरासमोर जाऊन अश्लील शिवीगाळ करत त्याला बाहेर बोलावले. पुन्हा मारहाण होईल या भीतीने इस्राईल घराबाहेर पडला नाही; त्याने तात्काळ पोलिसांना पाचारण केल्यानंतर पोलिसांनी त्या पाच युवकांना ताब्यात घेतले होते.

हा प्रकार इस्राईलच्या मनात सल बनून राहिला आणि ते युवक बाहेर आल्यानंतर त्यांना धडा शिकवण्याचा कट त्याने मनाशी रचला. दरम्यान, २८ नोव्हेंबर रोजी ते पाच युवक लुम्बिनी नगर परिसरात फिरत असल्याची माहिती इस्राईलला मिळाली. त्या वेळी त्यांच्यासोबत पृथ्वी माहूरकरही होता; मात्र १ नोव्हेंबरच्या वादात पृथ्वीचा सहभाग नव्हता, हे विशेष. त्या दिवशी सर्वांनी तिथेच जेवण करण्याचे ठरवले होते आणि संकल्प कुंभारे याला बिर्याणी आणण्यासाठी पाठवण्यात आले होते.

इस्राईलने आपल्या साथीदारांना तातडीने लुम्बिनी नगरात बोलावून घेतल्यानंतर हातात रॉड व तलवारी घेतलेले ११ युवक तिथे धडकले. ते पाच युवक दिसताच टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरून ते युवक पळू लागले; ज्यांना लक्ष्य करायचे होते, ते जंगलाच्या दिशेने पसार झाले. मात्र, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला पृथ्वी हल्लेखोरांच्या हाती लागला. त्याने एका घरात शिरून आश्रय घेण्याचा प्रयत्न केला, पण मारेकऱ्यांनी त्याला गाठत अंगणातच तलवार आणि रॉडने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात पृथ्वीचा जागीच मृत्यू झाला.

ज्यांच्यावर हल्ला करायचा होता ते निसटल्याने परत फिरणाऱ्या ११ जणांच्या टोळक्याला बिर्याणी घेऊन येत असलेला संकल्प कुंभारे दिसला. हादेखील त्यांच्याच गटातील असल्याच्या संशयावरून टोळक्याने त्याला बेदम मारहाण करून जखमी केले. दरम्यान, पृथ्वीचा मृत्यू झाल्याची माहिती मारेकऱ्यांना नव्हती. प्रकरण आपल्या अंगावर उलटू नये म्हणून हल्लेखोरांपैकी दोघांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून, ‘आम्हाला काही युवकांनी मारहाण केली’ अशी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत लुम्बिनी नगरात पृथ्वीची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि शहर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा (LCB), रामनगर पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने लुम्बिनी नगर घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींची ओळख पटवली आणि संयुक्त कारवाईत ११ जणांना अटक केली.

यामध्ये राज टेकाम, गोलू निमगडे, रॉयल उर्फ टंग्या पाटील, इस्राईल शेख, स्वरूप दुर्गे, ओम तोरे, जसीन खान, साहिल नामदूरवार, तन्मय शंख दरबार, अमन शेख आणि आर्यन चव्हाण यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी २० ते २५ वयोगटातील असून, त्यापैकी काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समजते. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. केवळ किरकोळ वादातून इतका मोठा रक्तपात घडला की यामागे परिसरातील गांजा व एमडी पावडर विक्रीच्या वर्चस्वाची लढाई दडली आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू असून, सखोल तपासातूनच या हत्याकांडाचे खरे मूळ कारण स्पष्ट होणार आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment