चिमूर – चिमूर पोलीस पाटील श्रीराम धारणे यांना शिवीगाळ झाल्याची घटना तालुक्यातील म्हसली गावात समोर आली आहे. दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत डी.जे. बंद करण्यास सांगितल्याचा राग यामागे असल्याची तक्रार आहे. फिर्यादीनुसार, मंडळाच्या अध्यक्षाने अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी चिमूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (लहान भावाने मोठा भावाला संपविले, नागभीड मधील घटना)
म्हसलीत नेमके काय घडले?
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान डी.जे. बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरून पोलीस पाटीलालाच अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी चिमूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मौजा म्हसली येथे ही घटना घडली असून, श्रीराम गुलाब धारणे (वय ३८, रा. म्हसली, ता. चिमूर) हे २०१६ पासून म्हसली गावचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी म्हसली येथे सार्वजनिक दुर्गा देवी विसर्जन मिरवणूक पार पडली, ज्यामध्ये दुर्गा देवी मंडळाचा अध्यक्ष सचिन दिलीप सोनवाने हा सहभागी झाला होता. या विसर्जन मिरवणुकीत डी.जे. लावला होता आणि पोलीस प्रशासनाच्या नियमांनुसार दुपारी दोन वाजेपर्यंतच डी.जे. वाजवण्याची परवानगी होती.
चिमूर पोलीस पाटील यांनी डी.जे. बंद करण्यास सांगितले
पोलीस प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत पोलीस पाटील श्रीराम धारणे यांनी दुर्गा देवी मंडळाच्या लोकांना दुपारी दोन वाजता डी.जे. बंद करण्यास सांगितले आणि त्यानुसार डी.जे. बंद करण्यात आला. दरम्यान, गावातील लोकांसोबत दुर्गा देवी मंडळाचा अध्यक्ष सचिन दिलीप सोनवाने हा नाचत होता, परंतु पोलीस पाटीलाने डी.जे. बंद केल्याचा राग मनात धरून त्याने पोलीस पाटलाला बघून घेण्याची धमकी देत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा डी.जे. बंद केल्याच्या कारणावरून आरोपी सचिन सोनवाने याने गावातील सरपंच संकेत धनराज सोनवाने याला फोन लावून पोलीस पाटलाबाबत अपशब्द वापरले.
पोलीस पाटीलाने डी.जे. कसा बंद केला आणि माझी पाटीलकी कशी काढतो, अशी भाषा वापरत आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली आणि या संपूर्ण शिवीगाळीचे मोबाईल रेकॉर्डिंग देखील फिर्यादीकडे उपलब्ध आहे. या प्रकरणी पीडित पोलीस पाटील श्रीराम गुलाब धारणे यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी आरोपी सचिन दिलीप सोनवाने (वय ३४, रा. म्हसली, ता. चिमूर, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम २९६ अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राजकुमार नामदेव चौधरी करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






