नागभीड: नागभीड भावाचा खून प्रकरणाने बाम्हणी गावात खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. या हल्ल्यात निकेश कुंभरे (३३) यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी प्रमोद कुंभरे (२८) हा स्वतःहून पोलिसांत हजर झाला आहे. आईच्या विनंतीवरून तो भावाची समजूत काढायला गेला होता, अशी माहिती आहे. नागभीड पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. (अमली पदारपदार्थाची चेकिंगचा बहाणा, एकाचे सोने लंपास, सावध रहा, बातमी वाचा)
नागभीड भावाचा खून: बाम्हणीत नेमके काय घडले?
घरी नेहमी वाद घालणाऱ्या मोठ्या भावाची समजूत काढण्यासाठी गेलेल्या लहान भावाने रागाच्या भरात डोक्यावर काठीने प्रहार केल्याने मोठ्या भावाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागभीड तालुक्यातील बाम्हणी येथे शनिवारी २४ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. निकेश बंडू कुंभरे (वय ३३ वर्ष) असे मृतकाचे नाव असून प्रमोद बंडू कुंभरे (वय २८ वर्ष) असे आरोपी लहान भावाचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर झाला असून या घटनेने संपूर्ण बाम्हणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आईच्या विनंतीवरून गेला होता लहान भाऊ
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक निकेश हा अविवाहित असून आईसोबत बाम्हणी येथे राहत होता, तर त्याचा लहान भाऊ प्रमोद हा देखील अविवाहित असून गावातच मामाच्या घरी राहत होता. निकेश याचे घरी दररोज कौटुंबिक कारणांवरून वाद होत असत. घटनेच्या दिवशीही निकेशचा आईसोबत तीव्र वाद झाला. मुलाचा सततचा त्रास सहन न झाल्याने आईने लहान मुलगा प्रमोदकडे धाव घेऊन निकेशला समजावून सांगण्याची विनंती केली. आईच्या विनंतीवरून प्रमोद भावाला समजावण्यासाठी घरी पोहोचला. त्याने निकेशला शांत राहण्याचा आणि वाद न घालण्याचा बराच वेळ प्रयत्न केला, परंतु निकेश ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
समजावून सांगूनही निकेशचे वाद घालणे सुरुच राहिल्याने प्रमोदचा संयम सुटला आणि त्याचा राग अनावर झाला. याच रागाच्या भरात प्रमोदने जवळच पडलेली लाकडी काठी उचलून थेट निकेशच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. या गंभीर हल्ल्यामुळे रक्तस्त्राव होऊन निकेशचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या हातून भावाचा खून झाल्याचे लक्षात येताच प्रमोदने तातडीने मामाकडे जाऊन घडलेल्या घटनेची आपबिती सांगितली, त्यानंतर मामाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनेचा सुगावा लागताच नागभीड पोलिसांनी बाम्हणी येथे तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, आरोपी प्रमोदने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले आहे. कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच भावाचा जीव घेतल्याच्या या दुर्दैवी घटनेमुळे बाम्हणी गावासह संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






