चंद्रपूर: अमली पदार्थ चेकिंग फसवणूक प्रकरणात नागभीड तालुक्यातील तळोधी हद्दीत एका शेतमजुराचा सोन्याचा गोप लंपास झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात इसमांनी अशोक रामटेके (६३) यांना वाटेत अडवले. “चेकिंग सुरू असल्याने सोने वापरता येत नाही,” अशी बतावणी त्यांनी केली. हातचलाखी करून सुमारे ३५ हजार रुपयांचा गोप त्यांनी लांबवला. याप्रकरणी तळोधी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे पुढील तपास करत आहेत. (रेल्वेत नोकरीचे आमिष, युवकाची फसवणूक, वाचा बातमी)
अमली पदार्थ चेकिंग फसवणूक कशी घडली?
अमली पदार्थांची चेकिंग सुरू असून सोने वापरता येत नाही, अशी बतावणी करत दोन अज्ञात इसमांनी एका दुचाकीस्वाराची दिशाभूल करून त्याच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा जुना गोप लांबविल्याची घटना नागभीड तालुक्यातील तळोधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी तळोधी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक माधव रामटेके (वय ६३, रा. मेंढा वलनी, ता. नागभीड, जि. चंद्रपूर) हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी भंडारा येथे शिक्षण घेत असून मुलगा सावरगाव येथील शाळेत आठव्या वर्गात शिकतो. दरम्यान, घरात साफसफाईचे काम सुरू असल्याने त्यांच्या पत्नीने अंगावरील जुना सोन्याचा गोप (अंदाजे १० ग्रॅम वजनाचा आणि ३५ हजार रुपये किमतीचा) त्यांना लावण्यासाठी दिला होता. शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) दुपारी अकरा वाजून तीस मिनिटांची वेळ झाली तरी मुलगा शाळेतून घरी न आल्यामुळे अशोक रामटेके हे आपल्या मोपेड गाडीने मेंढा वलनी येथून सावरगाव येथील शाळेकडे मुलाला पाहण्यासाठी निघाले होते.
कागदाच्या पुडीतून सोन्याचा गोप गायब
ते वलनी समोरील आणि सावरगाव अलीकडील नर्सरी जवळ पोहचले असता, पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी (वय अंदाजे ४० ते ५० वर्षे) त्यांना हात दाखवून गाडी थांबवण्यास सांगितली. “आम्ही मघापासून आवाज देत आहोत, तुम्ही गाडी का थांबवत नाही? तुम्ही बोर्ड वाचले नाही का, अमली पदार्थ चेकिंग सुरू आहे, त्यामुळे सोने वापरता येत नाही,” अशी बतावणी या भामट्यांनी केली. त्यानंतर भीतीपोटी अशोक रामटेके यांनी गळ्यातील सोन्याचा गोप काढून आपल्या मोपेड गाडीच्या डिक्कीत ठेवत असताना, त्यातील एका इसमाने “असे ठेवू नका, कागदाच्या पुडीत बांधून देतो,” असे म्हणत त्यांच्या हातातील गोप घेतला आणि तो कागदाच्या पुडीत बांधून गाडीच्या डिक्कीत ठेवून निघून जाण्यास सांगितले.
या भ्रामक बोलण्यावर विश्वास ठेवून अशोक रामटेके हे सावरगाव बस स्टॉपजवळ पोहचले. मात्र, मनात शंका आल्याने त्यांनी गाडीची डिक्की उघडून कागदाची पुडी उघडून पाहिली असता, त्यात त्यांचा सोन्याचा गोप नव्हता तर केवळ दोन पांढऱ्या रंगाच्या घरगुती वापराच्या गळ्यातील चैन मिळून आल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ तळोधी पोलीस ठाण्यात गाठून घडलेल्या प्रकाराची तोंडी तक्रार दिली. या तक्रारीवरून तळोधी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये अज्ञात दोन इसमांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस या भामट्यांचा कसून शोध घेत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






