चंद्रपूर: रेल्वे नोकरी फसवणूक प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, रेल्वेत सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले गेले. तक्रारीनुसार, फिर्यादीने एकूण ९ लाख रुपये दिले. त्यातील २ लाख परत मिळाले असून ७ लाख थकीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. याबाबत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक कृणाल रामटेके पुढील तपास करत आहेत. (चंद्रपुरात रात्री ११.३० वाजता डीजेचा दणदणाट, वाचा बातमी )
रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवून देण्याचे मोठे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल सात लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस वर्तुळात या मोठ्या फसवणूक प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
रेल्वे नोकरी फसवणूक : फिर्यादीची तक्रार काय?
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी विशाल सुधाकर वानखेडे (वय ३७, रा. मच्छीमार्केट बिनबा वार्ड, चंद्रपूर) हे खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नोव्हेंबर २०१४ मध्ये स्वराज शामरावजी भांदककर (रा. पठाणपुरा वार्ड, चंद्रपूर) याने फिर्यादी व त्यांच्या मित्राला माळी समाज भवन येथे गाठले. आरोपी स्वराज भांदककर याने रेल्वे विभागात सरकारी नोकरी मिळवून देण्याचे सांगत, आपला ओळखीचा आणि विश्वासातील माणूस नागपूर मनपात नोकरीस लागला असल्याचे भासविले. या नोकरीसाठी एकूण ९ लाख रुपये खर्च येईल असे त्याने सांगितले. सुरुवातीला फिर्यादीने विचार करण्यासाठी वेळ मागितला, मात्र नंतर जून २०१५ मध्ये चंद्रपूर शहरातील गांधी चौक परिसरात फिर्यादीने रोखीने ३ लाख रुपये स्वराज भांदककर याला सुपूर्द केले. यानंतर आरोपीने नागपूर येथील हुडकेश्वर कार्यालयात नेऊन नितीन दामोधर दारूनकर या दुसऱ्या आरोपीची ओळख करून दिली, ज्याने उर्वरित पैसे जॉइनिंग लेटर मिळाल्यानंतर देण्यास सांगितले.
२०१४ ते २०२५ : पैशांचे व्यवहार कसे झाले?
फसवणुकीचे हे जाळे वर्षानुवर्षे गुंतागुंतीचे होत गेले. २०१७ मध्ये आरोपींनी जॉइनिंग लेटर तयार असल्याचे सांगून फिर्यादी व त्यांच्या मित्राला नागपूर येथे बोलावले आणि तिथून इंदूरला नेऊन आणखी ६ लाख रुपये नगदी उकळले. परंतु इंदूरला पोहोचल्यावर कोणतेही जॉइनिंग लेटर मिळाले नाही आणि नंतर मुंबईला गेटवे ऑफ इंडिया येथे नेऊन देखील केवळ तोंडी आश्वासनेच देण्यात आली. वारंवार पाठपुरावा केल्यावर आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. दरम्यानच्या काळात आरोपींनी दिलेले धनादेश (चेक) स्पेलिंग मिस्टेक आणि अन्य कारणांमुळे बँकेतून परत आले.
फिर्यादीने सातत्याने आपल्या J पैसे मागितल्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. डिसेंबर २०२५ पर्यंत आरोपींनी केवळ फोनपेच्या माध्यमातून २ लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित ७ लाख रुपये देण्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नव्हे तर, “तुला जे करायचे ते कर, आमचे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही,” असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणाने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात येऊन दिलेल्या तक्रारीवरून स्वराज शामरावजी भांदककर आणि नितीन दामोधर दारूनकर या दोघाঁविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृणाल रामटेके करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






