Chandrapur AI Gold Scam प्रकरणातील आर्थिक फसवणुकीसंदर्भातील प्रतीकात्मक दृश्य

चंद्रपुरात AI Gold कंपनीचा ७४.३४ लाखांचा घोटाळा; सेवानिवृत्त शिक्षकाची फसवणूक, तीन संचालकांवर गुन्हा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 1, 2026

चंद्रपूर : (Chandrapur AI Gold Scam) चंद्रपूर शहरात AI Gold नावाच्या कथित कंपनीने दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त शिक्षकाची तब्बल ७४ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कंपनीच्या तीन संचालकांविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक फसवणुकीच्या रॅकेटचा तपास सुरू आहे.

गुंतवणुकीवर भरघोस परतावा आणि कर्ज फेडण्याचे आमिष दाखवून हैदराबाद येथील एका कथित सरकारी कंपनीने चंद्रपुरातील एका सेवानिवृत्त शिक्षकाला तब्बल ७४ लाख ३४ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात हैदराबाद येथील ‘ए आय गोल्ड’ कंपनीच्या तीन संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (पतसंस्थेत अडीच कोटींचा घोटाळा, १६ जणांवर गुन्हे दाखल)

Chandrapur AI Gold Scam प्रकरणात नेमके काय घडले?

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील बाबुपेठ अंतर्गत येणाऱ्या भिवापूर वार्ड (सरस्वती विद्यालयाच्या मागे) येथे राहणारे ६१ वर्षीय हिशोद पत्रुजी तुरे हे जून २०२३ मध्ये शिक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेची सुरक्षित गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने ते जटपुरा गेट येथील रोशन वालदे यांच्या प्रॉपर्टी डीलिंगच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्यांची भेट रोशन मोते नावाच्या व्यक्तीशी झाली.

मोते याने तुरे यांना हैदराबाद (तेलंगणा) येथील ‘ए आय गोल्ड’ ही एक शासकीय कंपनी असून, त्यात गुंतवणूक केल्यास अल्पावधीतच रक्कम दुप्पट होते, असे सांगून कंपनीच्या नेटवर्क प्लॅनची माहिती दिली. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी कुमारस्वामी कोमुरैया (रा. डब्ल्यू.सी.एल. क्वार्टर, नांदगाव पोडे) यानेही या कंपनीत गुंतवणूक केल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या सांगण्यावरून तुरे यांनी १९ जून २०२४ रोजी कोमुरैया याच्या बँक खात्यावर फोनपे द्वारे २५ हजार रुपये पाठवून पहिली गुंतवणूक केली.

यानंतर खरा फसवणुकीचा डाव सुरू झाला. फिर्यादी हिशोद तुरे यांच्या मालकीचे मौजा दाताळा येथे चार प्लॉट (भूमापन क्र. ३१२/१/११ ते १४) होते, जे त्यांनी सन २००२ मध्ये खरेदी केले होते. या प्लॉटवर कंपनीकडून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने रोशन मोते आणि कुमारस्वामी कोमुरैया यांनी २८ जून २०२४ रोजी तुरे यांना रामनगर येथील धीरज चौधरी यांच्याकडे नेले. सुरुवातीला हा व्यवहार पसंत नसल्याने तुरे यांनी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र रोशन मोते याने आपल्याकडे २ कोटींचे कॉइन असल्याचे आणि गरज पडल्यास स्वतःचे घर विकूनही तुमचे प्लॉट सोडवून देण्याची हमी घेतल्याने तुरे या व्यवहारास तयार झाले.

त्यानुसार धीरज चौधरी यांनी तुरे यांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा केले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे नोकर शेट्टी यांच्या नावे विसारपत्र करून १० लाखांचा चेक व ५ लाख रुपये रोख दिले. यानंतर ३ जुलै २०२४ रोजी ६५ लाख ५० हजार रुपयांमध्ये या प्लॉटचा खरेदीखत व्यवहार धीरज चौधरी यांच्या नावाने पूर्ण करण्यात आला.

या दरम्यान, रोशन मोते याने फिर्यादी तुरे यांना हैदराबाद येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयात नेले. तिथे कंपनीचे मालक व संचालक राजेश्वरी रेड्डी, शिवशंकर रेड्डी आणि रितीका रेड्डी यांची भेट झाली. त्यांनी तुरे यांना मोठी गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून १ कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले. मात्र, एवढी रक्कम नसल्याने प्लॉटच्या व्यवहारातून आलेले पैसे कंपनीत गुंतवण्याचे ठरले. प्लॉट सोडवून देणे, रजिस्ट्रीचा खर्च, दलाली आणि व्याजापोटी लागणारे प्रतिमहिना दीड लाख रुपये स्वतः कंपनीचे मालक भरणार असल्याचे आश्वासन आरोपींनी दिले होते. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्य आरोपी शिवशंकर रेड्डी याने एका साध्या कागदावर आपसी करारनामा लिहून देत ‘४० लाख रुपये प्राप्त झाले असून, ६ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान ८० लाख रुपये परत करू’ असे लेखी आश्वासनही दिले होते.

ठरलेल्या करारानुसार, फिर्यादी तुरे यांनी रितीका रेड्डी, राजेश्वरी रेड्डी आणि शिवशंकर रेड्डी यांच्या बँक खात्यावर व फोनपे द्वारे तसेच रोशन मोते व कुमारस्वामी यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण ५२ लाख रुपये थेट कंपनीत गुंतवले. याव्यतिरिक्त, धीरज चौधरी यांच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचे प्रतिमहिना १ लाख ५० हजार रुपयांप्रमाणे १६ महिन्यांचे व्याज भरणे आवश्यक होते, ज्यातील सुरुवातीचे केवळ ३ महिने कंपनीने भरले आणि उर्वरित १३ महिन्यांचे १९ लाख ५० हजार रुपये बुडवले.

तसेच रजिस्ट्रीचा खर्च १ लाख ६० हजार रुपये आणि दलालीचा खर्च १ लाख २४ हजार रुपये असा एकूण २२ लाख ३४ हजार रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड फिर्यादींना सोसावा लागला. आरोपींनी प्रत्यक्ष घेतलेले ५२ लाख रुपये आणि व्यवहारातील २२ लाख ३४ हजार रुपये मिळून एकूण ७४ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केली, तसेच दिलेली हमी न पाळता फिर्यादींचे मोक्याचे प्लॉटही सोडवून दिले नाहीत.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हिशोद पत्रुजी तुरे यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात येऊन रीतसर तोंडी तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी २९ जून २०२६ रोजी रात्री २३:३५ वाजता हैदराबाद येथील मुख्य आरोपी राजेश्वरी रेड्डी, शिवशंकर रेड्डी आणि रितीका रेड्डी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३(५) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक निशिकांत सुरेंद्र रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक क्रुणाल त्रिपाल रामटेके या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी काही स्थानिक नागरिकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment