सिंदेवाही: Navargaon Investment Fraud प्रकरणामुळे सिंदेवाही तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा 20 टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवून 11 जणांची तब्बल 11 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला आहे. नवरगावातील एका तरुणाविरुद्ध सिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. (अमावस्या, पौर्णिमेला घरासमोर काळी जादू)
शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास दरमहा २० टक्के भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून नवरगाव व परिसरातील ११ लोकांची तब्बल ११ लाख ८२ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नवरगाव येथील मुख्य संशयित आरोपी तुषार रंगनाथ सोनकुसरे याच्याविरुद्ध सिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Navargaon Investment Fraud मध्ये नेमके काय घडले?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नवरगाव येथील व्यंकटेश नगर, रत्नापूर फाटा येथील रहिवासी आणि ‘श्रीजी इलेक्ट्रॉनिक्स’ दुकानाचे चालक चिराग शैलेश कानाबार (वय २४) यांनी या संदर्भात सिंदेवाही पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली आहे. नवरगाव येथील माता चौक परिसरात राहणारा तुषार रंगनाथ सोनकुसरे हा सन २०२३ पासून स्वतः शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होता. त्याने गावातील लोकांना विश्वासात घेऊन, ‘माझ्याकडे रक्कम दिल्यास मी ती शेअर मार्केटमध्ये गुंतवून त्यावर दरमहा २० टक्के परतावा देईन’ असे आमिष दाखवण्यास सुरुवात केली होती.
सुरुवातीची दोन वर्षे त्याने काही लोकांना परतावा देखील दिला होता. त्याच्या या योजनेला भुलून फिर्यादी चिराग कानाबार यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी बँक ऑफ इंडिया, नवरगाव शाखेतून स्वतःचे सोन्याचे गोफ आणि अंगठी ९९,३९५ रुपयांत गहाण ठेवून तुषारच्या बँक खात्यावर रक्कम हस्तांतरित केली. चिराग यांनी २७ फेब्रुवारी २०२५ ते ९ मे २०२५ या कालावधीत वेळोवेळी एकूण २ लाख ९ हजार रुपये गुंतवले, ज्याच्या बदल्यात तुषारने त्यांना केवळ ५५ हजार रुपये परतावा म्हणून परत केले आणि उर्वरित १ लाख ५४ हजार रुपयांची मुद्दल व परतावा देण्यास टाळाटाळ केली.
फिर्यादी चिराग कानाबार यांच्याप्रमाणेच आरोपी तुषार सोनकुसरे याने नवरगाव, पेंढरी कोकेवाडा, अंतरगाव, सिंदेवाही आणि मोटेगाव (ता. चिमूर) येथील इतर अनेक तरुण व व्यापाऱ्यांना जास्त पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रकमा उकळल्या होत्या. यामध्ये प्रतीक ईश्वर निमजे (१,५०,००० रुपये), प्ररव रविनंद नागदेवते (१,६५,००० रुपये), सागर सर्जराव गायकवाड (१,४२,००० रुपये), मयुर सौगत खोब्रागडे (८५,००० रुपये), प्रबुद्ध आनंदराव गेडाम (२,१०,००० रुपये), विशाल घनशाम गजभिये (१९,००० रुपये), राहुल जीवन टेंभुर्णे (७७,००० रुपये), साहिल विश्वनाथ राउत (५०,००० रुपये), राहुल जयंत कामडी (८०,००० रुपये) आणि तन्मय शैलेश कानाबार (५०,००० रुपये) अशा एकूण १० लोकांची मिळून ११ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
या फसवणूक प्रकरणी चिराग कानाबार यांनी २० जून २०२६ रोजी सिंदेवाही पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तुषार रंगनाथ सोनकुसरे याच्याविरुद्ध बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम, २०१९ च्या कलम २१, २३, २५, २६ सह भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४) अन्वये गुन्हा (प्रथम खबर क्रमांक ०४४२/२०२६) दाखल केला आहे. सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कांचन पद्माकरराव पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रामदास निलेवार पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






