चंद्रपूर: नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याच्या आरोपावरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर पोस्ट ऑफिसमध्ये चपराशी पदाची नोकरी लावून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, यासाठी एकूण ३४ लाख ५३ हजार ६०० रुपये देण्यात आले. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५) व ३१८(४) नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश निकडे तपास करीत आहेत. (मौजमजेसाठी युवकांनी केल्या चोऱ्या, रामनगर पोलिसांनी केली अटक, वाचा बातमी)
नोकरीच्या आमिषाने फसवणूक: चंद्रपूर पोलिसांत गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यशमीत बुधाजी बागेश्वर (३५, रा. तुकुम चव्हाण कॉलनी, डब्ल्यूसीएल क्वार्टर्स, चंद्रपूर) हे सध्या दाताळा एमआयडीसी येथील एका खासगी एजन्सीमध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतात. फिर्यादींच्या आजीचा गंजवार्ड बाजारात भाजीपाल्याचा धंदा असल्यामुळे फिर्यादी लहानपणापासून आजीसोबत भाजी विक्री करायचे. याच दरम्यान आरोपी केतन जोरगेवार याच्या डिस्पोजलच्या दुकानावर त्याचे येणे-जाणे असल्याने त्यांची चांगली ओळख झाली होती. जानेवारी २०२४ मध्ये केतन जोरगेवार याने नागपूर येथील पोस्ट ऑफिसमध्ये चपराशी पदाच्या जागा निघाल्या असून, मी सरकारी नोकरी लावून देण्याचे काम करतो असे सांगून २२ ते २४ लाख रुपयांचा खर्च येईल असे सांगितले. फिर्यादीचा भाजीपाल्याचा व्यवसाय चांगला चालत असल्याने त्यांच्याकडे पैसे उपलब्ध होते. आरोपींनी त्यांच्या घरी बोलावून, ड्युटीचे काम पाहणारे साहेब दिल्लीत असून त्यांना पैसे पाठवावे लागतील असे सांगून वेळोवेळी रोख स्वरूपात, बँक चेकद्वारे तसेच फोनपेच्या माध्यमातून पैसे उकळणे सुरू केले.
फिर्यादीच्या तक्रारीत काय म्हटले आहे?
विशेष म्हणजे, सुरुवातीला आरोपीने नागपूरमधील एका व्यक्तीचे काम झाले होते परंतु त्याला कॅन्सर झाल्यामुळे तो नोकरी करणार नाही, त्यामुळे ते पैसे तू भरून तुझ्या नावे ती जागा करतो असे थापा मारल्या होत्या. आरोपींच्या सततच्या मागण्यांमुळे आणि लवकरच नोकरीची ऑर्डर मिळेल या विश्वासाने फिर्यादीने आपल्या मालकीचा प्लॅटसुद्धा गहाण ठेवून २ लाख रुपये १२ जून २०२४ रोजी रीमा जोरगेवार यांच्याकडे दिले. अशा प्रकारे फिर्यादीने वेळोवेळी रोख, बँक खात्यावर ऑनलाइन आणि चेकद्वारे एकूण ३४ लाख ५३ हजार ६०० रुपयांची रक्कम आरोपींना दिली.
दरम्यानच्या काळात फिर्यादीच्या घरातील सोन्याच्या पाच अंगठ्या गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एका मोपेड गाडीच्या डिक्रीत मुथूट फायनान्सची स्लिप पाहिली. चौकशी केली असता, केतन जोरगेवार याने त्या अंगठ्या मुथूट फायनान्समध्ये गहाण ठेवून पैसे उचलल्याचे समोर आले. याप्रकरणी विचारणा करण्यासाठी गेले असता केतनने उडवाउडवीची उत्तरे देऊन मोबाइल बंद करून फरार झाला होता. नंतर फिर्यादीने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर आरोपी चंद्रपूरला परत आला व त्याने सोन्याच्या अंगठ्या सोडवून परत केल्या. मात्र, नोकरीसाठी घेतलेले ३४ लाख ५३ हजार ६०० रुपये परत मागितले असता, आरोपीने फक्त १६ लाख रुपये देण्याचे मान्य केले आणि दोन महिन्यांचा अवधी मागितला. त्यानंतर दोन वर्षे उलटूनही पैसे दिले नाहीत आणि उलट पैसे मागण्यासाठी गेल्यावर आरोपींनी शिवीगाळ करून घरातील महिलांना धक्काबुक्की सुद्धा केली. अखेर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पीडित युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रपूर शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






