चंद्रपूर – Chandrapur Fake Certificate Racket प्रकरणाने संपूर्ण शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे. दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नामांकित विद्यापीठांची बनावट प्रमाणपत्रे, मार्कशीट व पदव्या तयार केल्या जात होत्या. यासाठी उमेदवारांकडून ५ ते १० लाख रुपये उकळले जात होते. (हे हि वाचा – दुचाकीच्या आवाजातून रक्तरंजित राडा)
दुर्गापूर पोलिसांनी याप्रकरणी तुकुम येथील आरोपीविरुद्ध फसवणुकीसह बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
Chandrapur Fake Certificate Racket: ५ ते १० लाखांत बोगस पदव्यांची विक्री
नोकरी, महाविद्यालयातील प्रवेश आणि पदोन्नती मिळवून देण्याच्या नावाखाली ५ ते १० लाख रुपयांना नामांकित विद्यापीठांची बोगस प्रमाणपत्रे, मार्कशीट व पदव्या विकणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा चंद्रपूरमध्ये पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी तुकुम परिसरातील रहिवासी आरोपी परिमल बाबुराव गौरकर याच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
कारमधील कापडी थैलीतून समोर आला धक्कादायक प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील तुकुम येथील चिंतामणी अपार्टमेंटमध्ये राहणारे वैभव गणपतराव माशीरकर हे एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. त्यांच्याच परिसरात राहणारा आरोपी परिमल बाबुराव गौरकर (वय ३२) याने जानेवारी २०२६ मध्ये फिर्यादी वैभव माशीरकर यांना फोन करून आपल्या वडिलांकडून कारची चाबी घेऊन गाडीतील एक कापडी थैली काढून घरात सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते. शेजारी असल्याने माशीरकर यांनी ती थैली काढून स्वतःच्या घरात ठेवली. त्यानंतर काही दिवसांनी परिमल गौरकर याने त्या थैलीतून काही प्रमाणपत्रे काढून नेली. पुन्हा काही दिवसांनी तो आणखी प्रमाणपत्रे नेण्यासाठी आला असता, माशीरकर यांनी या कागदपत्रांबद्दल विचारणा केली. त्यावेळी आरोपी गौरकर याने कोणाला नोकरी मिळवण्यासाठी, ॲडमिशनसाठी किंवा प्रमोशनसाठी पदवी, डिप्लोमा, टीसी व मार्कशीट लागत असल्यास संबंधितांकडून गरजेनुसार ५ ते १० लाख रुपये घेऊन आपण ही प्रमाणपत्रे तयार करून देत असल्याची धक्कादायक कबुली दिली.
त्यानंतर माशीरकर यांनी त्या थैलीची पाहणी केली असता, त्यामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, श्रीधर युनिव्हर्सिटी (पिलानी, राजस्थान), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) आणि छत्रपती शाहूजी महाराज युनिव्हर्सिटी (कानपूर) या नामांकित विद्यापीठांच्या सेमिस्टरच्या बनावट मार्कशीट्स, डिप्लोमा प्रमाणपत्रे व मायग्रेशन सर्टिफिकेट्स मोठ्या प्रमाणावर आढळून आले. या सर्व प्रमाणपत्रांवर विद्यापीठांचे बनावट शिक्के आणि खोट्या स्वाक्षऱ्या मारून ती तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. ही सर्व बनावट प्रमाणपत्रे स्वतःच्या घरात असल्याने आणि आरोपी बऱ्याच दिवसांपासून ती थैली परत नेण्यासाठी न आल्याने अखेर फिर्यादी यांनी कायदेशीर कारवाईसाठी दुर्गापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संपूर्ण हकीकत कथन केली.
या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे अनेकांनी खासगी तसेच शासकीय नोकऱ्या मिळवून शासन व कंपन्यांची मोठी दिशाभूल आणि फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. फिर्यादी वैभव माशीरकर यांच्या तक्रारीवरून दुर्गापूर पोलिसांनी आरोपी परिमल बाबुराव गौरकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४) (फसवणूक), ३३६(३) (बनावट दस्तऐवज तयार करणे) आणि ३४०(२) (बनावट दस्तऐवज खरे म्हणून वापरणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र नक्कनवार या बोगस प्रमाणपत्र रॅकेटचा पुढील सखोल तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






