Gadchandur Fake Certificate प्रकरणात पोलिसांची कारवाई

अंबुजा कंपनीत नोकरीसाठी बनावट पोलीस प्रमाणपत्र!; गुन्हेगारी रेकॉर्ड लपवण्यासाठी केला घोळ

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 17, 2026

गडचांदूर: Gadchandur Fake Certificate प्रकरणामुळे गडचांदूर परिसरात खळबळ उडाली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवून अंबुजा सिमेंट कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी बनावट पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करून सादर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कंपनी, शासन आणि पोलीस विभागाची फसवणूक केल्याचा आरोप आरोपींवर ठेवण्यात आला आहे. (धानोरकर कुटुंबात शेतीवरून वाद)

गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवून नामांकित कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी चक्क पोलीस विभागाचेच बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करून शासनाची व कंपनीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गडचांदूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी गडचांदूर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Gadchandur Fake Certificate प्रकरण नेमके काय आहे?

या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, अंबुजा सिमेंट कंपनी उप्परवाही (ता. कोरपना) येथे नोकरी मिळवण्यासाठी पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता होती. या प्रकरणातील आरोपी हनुमंत विठ्ठल कुसळे (वय ४० वर्षे, रा. वार्ड क्र. ०४, गडचांदूर) याच्यावर गडचांदूर पोलीस ठाण्यात यापूर्वीच वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याने, आपल्याला अधिकृतरीत्या पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळणार नाही याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्याने गडचांदूर येथीलच आपल्या ओळखीच्या दर्शन बंडू कोडापे (वय ३५ वर्षे, रा. वार्ड ०२, गडचांदूर) याच्या ‘रिदा सेतू सेवा केंद्र’ (नेट कॅफे) येथे संपर्क साधला.

या दोन्ही आरोपींनी आपापसात संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जिल्हा विशेष शाखा, चंद्रपूर यांच्या नावे बनावट पोलीस चारित्र्य सत्यापन प्रमाणपत्र तयार केले. या बनावट प्रमाणपत्रावर सत्यापन अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, जिल्हा विशेष शाखा चंद्रपूर अशी नोंद व बनावट ॲप्लिकेशन आयडी टाकण्यात आला होता. हनुमंत कुसळे याने हे बनावट प्रमाणपत्र अंबुजा सिमेंट कंपनीच्या पॅकिंग प्लांटमध्ये सादर करून तिथे नोकरी मिळवली.

या गंभीर प्रकरणाची गोपनीय माहिती गडचांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवादार भगवान पंढरी मुंडे यांना एका खबरीमार्फत मिळाली. त्यांनी या माहितीची गंभीर दखल घेत तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने अंबुजा सिमेंट कंपनी गाठून संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. कंपनीकडून प्राप्त झालेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जेव्हा जिल्हा विशेष शाखा, चंद्रपूर येथे संपर्क साधण्यात आला, तेव्हा तिथून असे कोणतेही प्रमाणपत्र जारी करण्यात आले नसल्याचे समोर आले. यावरून सदर प्रमाणपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी हनुमंत कुसळे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने दर्शन कोडापे याच्या सेतू केंद्रातून हे बनावट प्रमाणपत्र बनवून घेतल्याची कबुली दिली.

शासकीय कागदपत्रांचे बेकायदेशीररीत्या बनावटीकरण करून शासनाची आणि अंबुजा सिमेंट कंपनीची फसवणूक केल्याप्रकर्णी पोलीस हवालदार भगवान पंढरी मुंडे यांच्या लेखी तक्रारीवरून १७ जून २०२६ रोजी आरोपी हनुमंत विठ्ठल कुसळे आणि दर्शन बंडू कोडापे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३३७, ३३६(३), ३४०(२), ३१८(४) आणि ३(५) अन्वये गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी भीमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शंकरराव हेकडे या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment