चंद्रपूर – रामनगर बॅटरी चोरी प्रकरणी रामनगर पोलिसांनी तीन महाविद्यालयीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६३ बॅटऱ्या जप्त झाल्या. जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख ४१ हजार रुपये आहे. शहरातील एका होंडा सर्व्हिस सेंटरमधून ४७ बॅटऱ्या चोरीला गेल्या होत्या. एका शोरूममधून ७९ बॅटऱ्या गेल्या होत्या. दोन्ही गुन्ह्यांची पद्धत सारखी होती. पोलिसांनी सांगितल्यानुसार, तरुणांनी चैनीसाठी चोरी केल्याची कबुली दिली. (वेकोलि कर्मचाऱ्याचे संतापजनक कृत्य, वाचा बातमी)
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैनीच्या वस्तूंच्या मोहापायी दुचाकी वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या तीन महाविद्यालयीन तरुणांना रामनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी या कारवाईदरम्यान आरोपींकडून तब्बल १ लाख ४१ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईमुळे शहरात झालेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.
रामनगर बॅटरी चोरी: दोन ठिकाणी काय चोरीला गेले?
प्राप्त माहितीनुसार, पवनसुत होंडा सर्व्हिस सेंटरचे मॅनेजर सौरव अशोक पांडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, २१ ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत त्यांच्या सर्व्हिस सेंटरच्या गोडावूनमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या एकूण ४७ दुचाकींच्या बॅटऱ्या अज्ञात चोरांनी लांबवल्या होत्या. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, याशिवाय शिवशंकर होंडा शोरूममधूनही अशाच प्रकारे ७९ बॅटऱ्या चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही गुन्ह्यांचे स्वरूप आणि चोरांची चोरी करण्याची पद्धत एकसारखीच असल्याने आरोपी एकच असावेत, असा संशय बळावला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आरोपींचा शोध घेऊन गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे मार्गदर्शन केले होते. त्यानुसार रामनगर पोलिसांचे शोध पथक कसून तपास करत असताना, हा गुन्हा महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तीन तरुणांनी केला असून ते बंगाली कॅम्प परिसरात दुचाकीच्या बॅटऱ्या विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
पोलिसांना आरोपींचा सुगावा कसा लागला?
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले. तेजल रत्नाकर गेडाम (वय २१, रा. इंदिरानगर, वाल्मीक चौक, चंद्रपूर), अदित्य मारूती रामटेके (वय २०, रा. मसाला, तुकुम, चंद्रपूर) आणि सुजल अविनाश रत्नपारखी (वय २२, रा. बाबूपेठ, फुले वार्ड, चंद्रपूर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून विचारपूस केली असता, त्यांनी महागड्या चैनीच्या वस्तू खरेदी करण्याच्या मोहापायी ही चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चोरीच्या एकूण ६३ बॅटऱ्या जप्त केल्या असून, त्यांची एकूण किंमत १ लाख ४१ हजार रुपये आहे. या कारवाईमुळे रामनगर पोलीस ठाण्यातील दुचाकी बॅटरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून आणखीही मुद्देमाल मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सदर यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे तसेच पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडाम, पंकज पोंदे, सुरज शेडमाके व ब्ल्युटी साखरे यांच्या पथकाने पार पाडली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






