Rajura Firing News crime spot investigation

राजुरा गोळीबार प्रकरण: पिस्तूल पुरवणारे दोघे जेरबंद!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 26, 2026

राजुरा – Rajura Firing News मुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. राजुरा शहर न्यायालयासमोर सोमवारी भरदिवसा ही थरारक घटना घडली. नारळ पाण्याच्या दुकानात बसलेले विनोद उर्फ पापा जाधव यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गंभीर जखमी झालेल्या जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना गजाआड केले आहे. पोलीस ठाण्यावर जमावाने दगडफेक केल्याने तणाव वाढला आहे. (हे हि वाचा – राजुऱ्यात गोळीबार, एकाचा मृत्यू)

राजुरा शहर न्यायालयासमोर भरदिवसा घडलेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. नारळ पाण्याच्या दुकानात बसलेले विनोद उर्फ पापा जाधव (वय ३५, रा. सोमनाथपूर, राजुरा) यांच्यावर दोन अज्ञात युवकांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना काय?

सोमवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास न्यायालया समोरील प्रदीप बिअर बारलगत असलेल्या नारळ पाण्याच्या दुकानात विनोद जाधव बसले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जाधव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हल्लेखोरांचे आत्मसमर्पण, शस्त्र पुरवठा करणारेही गजाआड

गोळीबार केल्यानंतर मुख्य आरोपी करण मेकलवार (वय २२) आणि करण दीपक बाविसकर (वय २४, दोघेही रा. इंदिरानगर, राजुरा) यांनी स्वतःहून थेट राजुरा पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून हल्ल्यात वापरलेले पिस्तूल कुठून आणले, याचा छडा लावला. याप्रकरणी शस्त्र पुरवठ्याच्या संशयावरून परवेज शेख आणि कार्तिक खामनकर या दोघांना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता ४ वर पोहोचली आहे.

पोलीस ठाण्यावर तणाव व दगडफेक

दरम्यान, २५ ऑगस्ट रोजी मृत विनोद जाधव यांच्या संतप्त नातेवाईक आणि समर्थकांनी विनोद यांच्या मृतदेहासह पोलीस ठाणे गाठले, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती, यावेळी जमावातील काही तरुणांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या वाहनावर दगडफेक केली. पोलिसांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सौम्य बळाचा वापर करत जमावाला पांगवले आणि तणाव नियंत्रणात आणला.

हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

घटनेला जवळपास ४८ तास उलटूनही हत्येमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. ही हत्या वर्चस्वाच्या वादातून झाली की आर्थिक व्यवहारातून, याचा उलगडा करण्यासाठी राजुरा पोलीस सर्व आरोपींची कसून फेरचौकशी करत आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment