सावली : Sawali Headmaster Attack News मुळे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. मुख्याध्यापकाच्या ओला मोपेड गाडीला कारने जोरदार धडक देण्यात आली. त्यानंतर आरोपी पती-पत्नीने रस्त्यावरील दगड फेकून मारहाण केली. सावली पोलिसांनी याप्रकरणी शिक्षिका आणि तिच्या पतीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Sawali Headmaster Attack News विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीवरून शाळेत सुरू झाला वाद
शाळेतील विद्यार्थ्याला मारहाण केल्याच्या कारणावरून विचारणा केल्याचा राग मनात धरून सहाय्यक शिक्षिका आणि तिच्या पतीने मिळून मुख्याध्यापकाच्या मोपेड गाडीला कारने जोरदार धडक दिली. एवढ्यावरच न थांबता खाली पडलेल्या मुख्याध्यापकाला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याची धक्कादायक घटना सावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी सावली पोलिसांनी शिक्षिका शुभांगी रामभाऊ लगडेवार आणि तिचे पती धनंजय विश्वासराव आंबटकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
मुख्याध्यापकांनी पालकांना बोलावल्याने शिक्षिकेचा संताप
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, संदीप राघोबाजी कामडी (वय ५८, रा. आयटीआय चौक, गोकुळ नगर, गडचिरोली) हे कापसी येथील भैयाजी पाटील भांडेकर हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शाळेत शुभांगी रामभाऊ लगडेवार या माध्यमिक सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी शिक्षिका लगडेवार यांनी नववीतील एका विद्यार्थ्याला मारहाण केली होती. तो विद्यार्थी आजारी असल्याने शाळेत आला नाही म्हणून मुख्याध्यापकांनी त्याच्या वडिलांना शाळेत बोलावून विचारपूस केली. याचा राग मनात धरून शिक्षिका लगडेवार यांनी “तुम्ही विद्यार्थ्याच्या पालकांना माझ्याविरुद्ध भडकवत आहात,” असा आक्षेप घेत वाद घातला आणि पतीला फोन करून शाळेत बोलावून घेतले.
त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी दुपारी शाळा सुटल्यानंतर मुख्याध्यापक कामडी हे बँकेतील काम आटोपून आपल्या ओला मोपेड गाडीने (क्र. MH 33 AH 0417) गडचिरोलीकडे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, पांढऱ्या रंगाच्या कारमधून शिक्षिका व तिचे पती पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्याने मुख्याध्यापक घाबरले आणि त्यांनी गाडी पुन्हा कापसीच्या दिशेने वळवली. मात्र, नागोबा मंदिरासमोर पाठीमागून वेगाने आलेल्या कार चालकाने मुख्याध्यापकांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे मोपेड रस्त्याच्या कडेला असलेल्या माईलस्टोनवर आदळून मुख्याध्यापक खाली कोसळले.
त्यानंतर कारमधून खाली उतरलेल्या शिक्षिका शुभांगी लगडेवार आणि पती धनंजय आंबटकर यांनी मुख्याध्यापकांना रस्त्यावरील दगड उचलून फेकून मारण्यास सुरुवात केली आणि अश्लील शिवीगाळ केली. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी मध्यस्थी केल्याने आरोपी पती-पत्नी तिथून निघून गेले. त्यानंतर आरोपींनी थेट मुख्याध्यापकांच्या गडचिरोली येथील घरी जाऊन त्यांच्या पत्नीलाही धमकावल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर जखमी मुख्याध्यापक संदीप कामडी यांनी सावली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून सावली पोलिसांनी आरोपी शिक्षिका शुभांगी लगडेवार व धनंजय आंबटकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १२५, १२५(a), २८१, २९६, ३(५) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






