राजुरा (चंद्रपूर): राजुरा सत्तुर अटक प्रकरणात पोलिसांनी सोमनाथपूर परिसरातून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी, २ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता ही कारवाई झाली. आरोपी सार्वजनिक रस्त्यावर हातात धारदार सत्तुर घेऊन फिरत होता. राजुरा पोलिसांची गस्त सुरू असताना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून ३४ सेमी लांबीचा लोखंडी सत्तुर जप्त करण्यात आला. याप्रकरणी शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. (घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय, गुन्हे शाखेची धाड, वाचा हि बातमी)
राजुरा सत्तुर अटक: गस्तीदरम्यान मिळाली गुप्त माहिती
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राजुरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सुभाष लोकरे हे त्यांच्या पथकासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई, कॉम्बिंग ऑपरेशन व नाकेबंदीच्या अनुषंगाने खाजगी वाहनाने गस्त घालत होते. गस्त सुरू असतानाच गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की, सोमनाथपूर प्रभाग क्र. ११ येथील झेंड्याजवळ एका सार्वजनिक रस्त्यावर एक इसम हातात घातक शस्त्र घेऊन संशयास्पद स्थितीत फिरत आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न करता दोन पंचांसह सोमनाथपूर भागातील झेंड्याजवळ सापळा रचला. बातमीनुसार परिसरात एक तरुण हातात सत्तुरसारखे धारदार शस्त्र घेऊन फिरताना दिसून आला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून चौफेर घेराव घालत त्या इसमाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव वैभव सुरेश रेगुंडावार (वय २२, रा. सोमनाथपूर प्रभाग क्र. ११, राजुरा) असे सांगितले.
शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल, तपास सुरू
पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सुमारे ३४ सेमी लांबीचा आणि ४०० रुपये मूल्याचा एक लोखंडी धारदार व टोकदार सत्तुर जप्त केला. या शस्त्राबाबत व ते बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता, आरोपीने पोलिसांना असमाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे दिली. शहरात आणि परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानेच विनापरवाना व अवैधपणे हे घातक शस्त्र बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सदर शस्त्र घटनास्थळीच रीतसर पंचनामा करून जप्त केले.
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे यांच्या तक्रारीवरून आरोपी वैभव रेगुंडावार याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा (शस्त्र अधिनियम) १९५९ च्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर साखराम तुमरम या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






