Bramhapuri Crime News police seized illegal gun from accused at mendki

घेराव घालत अटक केली, ब्रम्हपुरी पोलिसांनी जप्त केली भरमार बंदूक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 9, 2026

ब्रह्मपुरी : Bramhapuri Crime News समोर आली असून ब्रह्मपुरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मेंडकी ते गणेशपूर रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ मध्यरात्री पोलिसांनी सापळा रचला. यावेळी एका इसमाला बेकायदेशीर भरमार बंदुकीसह रंगेहात पकडण्यात आले.

पोलिसांनी आरोपीकडून तब्बल १२ हजार रुपये किमतीची भरमार बंदूक जप्त केली आहे. या धाडसी कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (हे हि वाचा – पोलीस ठाण्यात आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न)

Bramhapuri Crime News: मेंडकी मार्गावर मध्यरात्री थरारक कारवाई

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या विनापरवाना अग्निशस्त्र (भरमार बंदूक) बाळगणाऱ्या इसमावर पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला रंगेहात जेरबंद केले आहे. ही कारवाई मंगळवारी, ८ सप्टेंबरच्या रात्री १०:३० ते ११:३० वाजण्याच्या सुमारास मेंडकी ते गणेशपूर रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे १२ हजार रुपये किमतीची एक जुनी वापरती भरमार बंदूक आणि दारूगोळा ठासण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.

खबऱ्याकडून गुप्त माहिती आणि ब्रह्मपुरी पोलिसांचा तत्काळ सापळा

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रेखालाल भैयालाल गौतम हे आपल्या पथकातील पोलीस हवालदार रतन लेनगुरे, शरद सावसाकडे, पोलीस शिपाई अमोल लोनबले, अभिषेक आगाशे व शुभम लेडांगे यांच्यासह मेंडकी पोलीस चौकीच्या हद्दीत खासगी वाहनाने गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत होते. या गस्तीदरम्यान एका इसमाकडे बेकायदेशीर अग्निशस्त्र असून तो मेंडकी ते गणेशपूर रस्त्याने पायी जात असल्याची गुप्त माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. माहितीचे गांभीर्य ओळखून उपनिरीक्षक गौतम यांनी तत्काळ ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांना या संदर्भात अवगत केले आणि त्यांच्या सूचनेनुसार कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या.

आरोपी अंबरसिंग दुधानी याच्याकडून १२ हजार रुपयांची भरमार बंदूक जप्त

पोलिसांनी मेंडकी परिसरातील वैभव यशवंत कुंभरे व प्रदीप वासुदेव गुरनुले या दोन पंचांना बोलावून सोबत घेतले आणि संशयिताचा शोध सुरू केला. मेंडकी ते गणेशपूर मार्गावरील स्मशानभूमीजवळ पोहोचताच खबऱ्याने दिलेल्या वर्णनानुसार एक संशयित इसम पायी जाताना पथकाला दिसून आला. पोलिसांनी तात्काळ आपले वाहन थांबवून त्याला घेराव घालत ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अंबरसिंग बच्चनसिंग दुधानी (वय ४० वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. रूपाळामेंढा/आकापूर, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) असे असल्याचे सांगितले.

पोलिसांनी पंचांसमक्ष त्याची तपासणी केली असता, त्याच्या ताब्यात एक लाकडी बनावटीची आणि लोखंडी नळी असलेली मोठी भरमार बंदूक मिळून आली. या शस्त्राच्या परवान्याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता, सदर इसमाकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे समोर आले. जप्त करण्यात आलेली बंदूक सुमारे १३२ सेमी लांबीची असून त्यात ८७ सेमीची लाकडी बॉडी, ९१ सेमी लांबी व ८ सेमी गोलाईचे लोखंडी बॅरल, लोखंडी हॅमर, ट्रिगर तसेच बारूद ठासण्यासाठी लागणारा ८९ सेमी लांबीचा लोखंडी रॉड असा ऐवज समाविष्ट आहे.

विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या प्राणघातक शस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतला व आरोपी अंबरसिंग दुधानी यास अटक केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रेखालाल गौतम यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा (आर्म्स ॲक्ट) १९५९ च्या कलम ३ व २५ अन्वये गुन्हा नोंद क्रमांक ०७०० दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज ओमनराव शेलोकार यांच्याकडे सोपवण्यात आला असून, हे शस्त्र आरोपीने कुठून आणले व ते कोणत्या हेतूने बाळगले होते, या दिशेने पोलीस यंत्रणा तपास करत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment