वरोरा (चंद्रपूर): चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे Warora Police Station Attack ची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपीने तपास कक्षातच टोच्याने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या वेळी आरोपीला वेळीच रोखताना पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आरोपीविरुद्ध नवीन गुन्हा नोंदवला आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात कोट्यवधी रुपयांचा फॉरेक्स घोटाळा)
Warora Police Station Attack दरम्यान तपास कक्षात उडालेला गोंधळ
फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपीने पोलीस ठाण्यातील तपास पथक कक्षातच धारदार लोखंडी टोच्याने स्वतःवर वार करून आत्महत्येचा थरारक प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वरोरा येथे घडली आहे. या वेळी आरोपीला रोखण्यासाठी पुढे सरसावलेल्या पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी झटापटीत जखमी झाले असून, पोलिसांनी तत्परता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न करणे आणि पोलिसांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेनुसार आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोपाळ प्रवासादरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा येथील शिवनेरी नगरी (देशपांडे पेट्रोल पंपामागे) येथे राहणारा आरोपी विनोद शामराव सोयाम (वय ४०) याच्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, न्यायालयाने त्याला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम हस्तगत करण्यासाठी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनीष तालेवार, हवालदार संदीप मुळे, पोलीस अंमलदार विशाल राजुरकर आणि तक्रारदार रूपेश मुल्लेमवार हे तपास पथक एका खाजगी वाहनाने आरोपीला सोबत घेऊन मध्य प्रदेशातील भोपाळ येथे रवाना झाले होते.
मात्र प्रवासादरम्यान बैतुलजवळ पोहोचल्यानंतर आरोपी विनोद सोयाम याने फसवणुकीच्या रकमेबाबत कोणतीही स्पष्ट माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. केवळ कोठडीचा कालावधी संपवण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी त्याने भोपाळचे खोटे कारण सांगितल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार पथकाने भोपाळचा प्रवास रद्द करून आरोपीसह वरोरा येथे परतण्याचा निर्णय घेतला.
“रक्कम रिकव्हर करून दाखवा”; आरोपीचे पोलिसांना थेट आव्हान
सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास हे पथक वरोरा पोलीस ठाण्यात परतले. त्या वेळी ठाण्याच्या आवारात गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याने, गर्दी टाळण्यासाठी उपनिरीक्षक तालेवार यांनी आरोपीला थेट तपास पथक कक्षात नेले. तेथे बसवून रकमेबाबत चौकशी सुरू असतानाच आरोपीचा पारा अचानक चढला. “तुम्ही काय पोलीस आहात, मी फसवणूक केलेली रक्कम शोधून आणि रिकव्हर करून दाखवा,” असे पोलिसांना थेट आव्हान देत त्याने कक्षातील टेबलावर ठेवलेला लाकडी मूठ असलेला टोकदार लोखंडी टोचा उजव्या हातात घेतला आणि स्वतःवर वार करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार लक्षात येताच तपास अधिकारी तालेवार, हवालदार संदीप मुळे आणि अंमलदार विशाल राजुरकर यांनी कसलाही विचार न करता आरोपीवर झडप घालून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत आरोपीने स्वतःवर वार केल्यामुळे त्याच्या पोटावर व मानेवर खरचटून जखम झाली, तर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात उपनिरीक्षक मनीष तालेवार यांच्या दोन्ही हातांच्या मनगटावर, हवालदार संदीप मुळे यांच्या हाताच्या पंज्याला आणि अंमलदार विशाल राजुरकर यांच्या डाव्या हाताच्या पंज्याला जखमा झाल्या.
पोलिसांनी तत्परतेने आरोपीच्या हातातील टोचा हिसकावून घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. यानंतर सर्व जखमी पोलीस कर्मचारी व आरोपीला तात्काळ वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले व वैद्यकीय अहवाल प्राप्त करून घेण्यात आला. रुग्णालयातून परतल्यानंतर आरोपी विनोद सोयाम याला सुरक्षितपणे पोलीस कोठडीत (हवालात) डांबण्यात आले आहे.
तपास अधिकाऱ्यांना गुन्ह्याच्या तपासात अडथळा निर्माण करणे, फसवणुकीची रक्कम जप्त होऊ नये म्हणून दबाव आणणे आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून पोलिसांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी हवालदार रूपेश मुल्लेमवार यांच्या तक्रारीवरून आरोपी विनोद सोयामविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२६ आणि १२५(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गौरकार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






