चंद्रपूर : चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील पोलीस दलाला सक्षम करण्यासाठी Chandrapur Police Land Fund अंतर्गत ३० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नवीन चंद्रपूर विकास योजनेतील राखीव जागेचे भूसंपादन या निधीतून केले जाईल. यामुळे पोलिसांसाठी आधुनिक प्रशिक्षण केंद्र आणि शासकीय निवासस्थानांची उभारणी वेगाने सुरू होणार आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरातील ३०० घर पाण्याविना)
Chandrapur Police Land Fund साठी ३० कोटी ५२ लाखांची तरतूद
चंद्रपूरच्या पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासोबतच पोलीस अधिकारी व अंमलदारांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सातत्याने संवेदनशील भूमिका घेणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर पोलीस विभागासाठी आरक्षित जमिनीच्या भूसंपादनासाठी ३० कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन चंद्रपूर विकास योजनेतील पोलीस विभागासाठी आरक्षित जागेचा उपयोग डॉग स्क्वॉड ट्रेनिंग सेंटर, पोलीस भरतीसाठी शारीरिक मैदान, प्रशिक्षण केंद्र, बी.डी.डी.एस. ट्रेनिंग सेंटर, इनडोअर फायरिंग बट, पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी शासकीय निवासस्थान तसेच विविध योजनांसाठी करण्यात येणार आहे. नवीन चंद्रपूर येथे होणाऱ्या या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने झालेली ही प्रशासकीय कार्यवाही चंद्रपूरच्या पोलीस प्रशासनाला अधिक सक्षम अधिष्ठान देणारी ठरणार आहे.
नवीन चंद्रपूर विकास योजनेमध्ये मौजा कोसारा येथील आरक्षण क्र. ११० मधील ८.३० हेक्टर तसेच मौजा दाताळा येथील आरक्षण क्र. १३३ मधील १२.२५ हेक्टर जमीन पोलीस विभागाच्या आरक्षणाने बाधित जागा भूसंपादन करण्यात येणार आहे. या जमिनीवर पोलीस विभागासाठी विविध महत्त्वपूर्ण सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉग स्क्वॉडच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र सुविधा, पोलीस भरती प्रक्रियेसाठी आवश्यक शारीरिक मैदान, प्रशिक्षण केंद्र, बी.डी.डी.एस. प्रशिक्षण केंद्र, इनडोअर फायरिंग बट, अधिकारी व अंमलदारांसाठी शासकीय निवासस्थान तसेच इतर आवश्यक बांधकामे आणि विविध योजनांचा समावेश आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश
पोलीस दल हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास कार्यरत असते. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणापासून निवासापर्यंत आणि अत्याधुनिक कौशल्यविकासापासून आवश्यक कार्यसुविधांपर्यंत प्रत्येक बाबतीत सक्षम पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस विभागाच्या सुविधांकडे नेहमीच संवेदनशीलतेने पाहिले आहे. पोलीस स्टेशन इमारती, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था आणि त्यांच्या घरकुलाचा प्रश्न यानंतर आता प्रशिक्षण आणि इतर अत्यावश्यक सुविधांसाठी जमीन उपलब्ध करून देण्याच्या दिशेने त्यांनी पुढाकार घेतला आहे.
पोलीस अधिकारी व अंमलदारांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने शासनस्तरावर भूमिका मांडली आहे. पोलीस दलाच्या कार्यक्षमतेसोबतच त्यांच्या कल्याणाचा विचार करणारी त्यांची भूमिका यापूर्वीही विविध निर्णयांतून दिसून आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतींसाठी पुढाकार घेणे तसेच प्रलंबित डीजी लोन योजनेच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठविणे, या माध्यमातून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पोलीस दलाच्या मूलभूत गरजांना प्राधान्य दिले आहे.
नवीन चंद्रपूर विकास योजनेतील मौजा कोसारा येथील आरक्षण क्र. ११० मधील ८.३० हेक्टर आर आणि मौजा दाताळा येथील आरक्षण क्र. १३३ मधील १२.२५ हेक्टर आर पोलीस विभागाच्या आरक्षणाने बाधित जमीन भूसंपादन करण्यासाठी यापूर्वीच ४३ कोटी ६५ लाख ८३ हजार १६ रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. त्यापैकी आता ३० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या विविध सुविधा उभारण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संबंधित शासन निर्णयानुसार या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. चंद्रपूरच्या पोलीस प्रशासनाला केवळ आधुनिक कार्यालयीन सुविधा नव्हे, तर प्रशिक्षण, तंत्रज्ञान, निवास आणि कार्यक्षमतेला पूरक सर्वसमावेशक पायाभूत सुविधा मिळाव्यात, या व्यापक दृष्टिकोनातून आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ही महत्त्वपूर्ण कार्यवाही होत आहे. त्यामुळे भविष्यात चंद्रपूरच्या पोलीस यंत्रणेच्या क्षमतावृद्धीसोबतच अधिकारी व अंमलदारांच्या सुविधांमध्येही मोठी भर पडणार आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






