चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांना Chandrapur Water Crisis चा सामना करावा लागत आहे. एकोरी वॉर्ड परिसरातील ३०० घरांमध्ये पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील शासकीय नळ दीर्घकाळापासून तुटलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी लांबच्या हातपंपावर जावे लागत आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास युवासेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. (हे हि वाचा – वीज चोरी करणार तर महावितरण नाव करणार जाहीर)
एकोरी वॉर्डातील ३०० घरांवर पाणीटंचाईचे संकट
चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक १०, एकोरी वॉर्ड परिसरातील सुमारे ३०० घरांच्या वस्तीमध्ये सध्या पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या समस्यांची महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवासेनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार तसेच शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, सचिव सूरज चव्हाण, युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे, युवासेना चंद्रपूर विस्तारक संदीप रियाल पटेल, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे आणि महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक सुरेश पचारे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन आयुक्तांना सादर करण्यात आले.
पाण्यासाठी पायपीट, अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
एकोरी वॉर्डातील सुमारे ३०० घरांच्या वस्तीमध्ये शासकीय नळ जोडणी दीर्घकाळापासून तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर असलेल्या हातपंपावर भटकंती करावी लागत आहे. ऐन उन्हा-पावसात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
याशिवाय परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे साथीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मूलभूत हक्कांसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छ परिसर मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. मनपा प्रशासनाने तुटलेले नळ तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली. प्रशासनाने यावर लवकरात लवकर ठोस कार्यवाही न केल्यास नागरिकांच्या हक्कासाठी मनपाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेने दिला आहे.
युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित
हे निवेदन सादर करताना चंद्रपूर तालुकाप्रमुख सागर गभणे, शहरप्रमुख सय्यद फरदीन, तालुका समन्वयक पवन उडाके, विवान रामटेके, आरिश शेख, सय्यद आकिब, रझा सिद्दीकी, सलमान शेख, फरहान शेख, जाहिद शेख, काशिफ शेख, शाहजान शेख, रोशन खोब्रागडे, धम्मदीप खोब्रागडे, रितिक रायपुरे, मंगेश रायपुरे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






