चंद्रपूर : Chandrapur Congress Crisis मुळे चंद्रपूर शहरातील काँग्रेस राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर गट आणि आमदार विजय वडेट्टीवार गट यांच्यातील संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. मनपा गटनेते राजेश अडूर यांच्या विरोधात बहुसंख्य नगरसेवक एकत्र आल्याने अडूर यांच्या पदाला धोका निर्माण झाला आहे. या घडामोडींमुळे चंद्रपूर महापालिकेतील सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षांतर्गत उफाळून आलेला अंतर्गत कलह आता टोकाला पोहोचला असून, खासदार प्रतिभा धानोरकर गट आणि आमदार विजय वडेट्टीवार गट यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. दोन्ही गटांकडून समांतर हालचाली झाल्याने चंद्रपूर काँग्रेसमधील वातावरण कमालीचे तापले आहे. एका बाजूला अधिकृत गटनेते राजेश अडूर यांच्या नेतृत्वाखाली काही नगरसेवकांची बैठक पार पडली, तर दुसऱ्या बाजूला पक्षातील बहुसंख्य नगरसेवकांनी एकत्र येत थेट गटनेत्याविरुद्धच अविश्वास प्रस्ताव पारित करून त्यांची उचलबांगडी करण्यावर एकमत केले आहे. या राजकीय भूकंपाने चंद्रपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून यात धानोरकर गटाचे पारडे वडेट्टीवार गटापेक्षा जड असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.
Chandrapur Congress Crisis ने चंद्रपूर काँग्रेसमध्ये निर्माण केलेली खळबळ
या राजकीय संघर्षाची ठिणगी १४ जून रोजी जिल्हा काँग्रेस कार्यालयात गटनेते राजेश अडूर यांनी बोलावलेल्या विशेष बैठकीतून पडली. या बैठकीला अडूर यांच्यासह सचिन कत्याल, वसंत देशमुख, चंदाताई वैरागडे, विनोद लभाने, वैशाली चंदनखेडे, अभिषेक डोईफोडे, अनिता चौखे, करिश्मा जंगम, सफिया तवंगर खान आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संजीवनी वासेकर असे एकूण ११ नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत मनपातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, मात्र मुख्य रोष अनुपस्थित नगरसेवकांवर होता.
अधिकृत नोटीस, व्हॉट्सॲप संदेश आणि लेखी पत्र देऊनही बैठकीला गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांवर पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्याचा आक्रमक निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच विरोधी गटाने बोलावलेली समांतर बैठक पूर्णपणे नियमबाह्य, अवैध व असंवैधानिक असून तिचा पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी संबंध नसल्याचे सांगत गटनेत्यांनी सर्व नगरसेवकांना त्या बैठकीपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. (राजेश अडूर यांच्या बैठकीत १० प्रत्यक्ष तर १ नगरसेवक ऑनलाईन उपस्थित)
मात्र, गटनेत्यांचा हा इशारा धुडकावून लावत काँग्रेसच्या बहुसंख्य नगरसेवकांनी थेट बंडाचे निशाण उपसले. मनपाच्या एकूण २७ नगरसेवकांपैकी काही नगरसेवकांनी राजेश अडूर यांचे दावे अत्यंत दिशाभूल करणारे आणि हास्यास्पद असल्याचे म्हटले. गटनेता हा कधीही बहुमतापेक्षा मोठा असू शकत नाही आणि बहुमताच्या जोरावर गटनेता बदलण्याचा स्पष्ट अधिकार लोकशाहीने दिला असल्याचे या गटाने ठामपणे मांडले.
अडूर यांनी नागपूर विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या काँग्रेस गटाच्या घटनेतील नियम ३, ४ आणि ८ चा हवाला देत बंडखोर नगरसेवकांनी स्पष्ट केले की, गटाचा प्रत्येक निर्णय लोकशाही मार्गाने बहुमतानेच घेतला जाईल आणि तो सर्व सदस्यांवर बंधनकारक राहील. गटनेत्याला स्वतःच्या मर्जीने मनमानी कारभार करण्याचे कोणतेही स्वातंत्र्य नसून बहुमताने घेतलेला निर्णय केवळ लेखी कळविणे हेच त्यांचे काम आहे, असे सांगत अडूर म्हणजे स्वतः संपूर्ण पक्ष नव्हे, अशी घणाघाती टीका करण्यात आली.
या नाट्यमय घडामोडींचा पुढचा अंक आज १५ जून रोजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि शहराध्यक्ष शिवा राव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत पाहायला मिळाला. या बैठकीला काँग्रेसचे एकूण १६ नगरसेवक प्रत्यक्ष उपस्थित होते. या बैठकीमध्ये महानगरपालिका गटनेते राजेश अडूर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, त्यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यावर सर्वानुमते एकमत झाले आहे अशी माहिती आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गोटात मोठी उलथापालथ झाली आहे. थेट गटनेत्यालाच पदावरून हटवण्याइतपत संख्याबळ एकत्र आल्यामुळे चंद्रपूर काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात आज खासदार प्रतिभा धानोरकर गटाने विजय वडेट्टीवार गटावर मात करत आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले आहे. दोन समांतर बैठका आणि एकमेकांवर कारवाईच्या पवित्र्यामुळे चंद्रपूर मनपा काँग्रेसमधील हा वाद आता थेट विभागीय आयुक्तांच्या दारात आणि न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची चिन्हे आहेत.
आजच्या बैठकीत कोण उपस्थित?
- १. श्रीमती संगीता मंगल भोयर
- २. श्रीमती संगीत गोपाल अमृतकर
- ३. श्री अजय निळकंठराव बल्की
- ४. साईदाबी राजू शेख
- ५. श्री. रामनरेश कुवारलाल यादव
- ६. सौ. वैशाली अजय महाडूळे
- ७. श्री. सुरेंद्र विठ्ठलराव अडबाले
- ८. श्री. राहुल गेद्लाल चौधरी
- ९. श्री राहुल अरुण घोटेकर
- १०. श्रीमती करुणा शंकर चालखूरे
- ११. श्री. आकाश मिलिंद मानकर
- १२. श्री. सुनील गोपालदास खडेलवाल
- १३. श्रीमती शिला दत्तू सिडाम
- १४. श्रीमती महानंदा रवींद्र वाडके
- १५. श्रीमती सुनंदा दिलीप धोबे
- १६. श्रीमती वनश्री केशव मेश्राम
चंद्रपूर मनपा निवडणुकीनंतर हा कांग्रेस पक्षातील वाद उफाळून आला, गटनेतेपदावरून वडेट्टीवार-धानोरकर गटात संघर्ष उफाळून आला होता, वडेट्टीवार यांनी नगरसेवकांची जुळवाजुळव केली मात्र मनपा सत्तेपासून दूर राहिले, गटनेता पद वडेट्टीवार गटाला मिळाला मात्र गटनेता राजेश अडूर यांनी या संघर्षाला अधिक तीव्र केले त्यांनी स्थायी समिती मध्ये धानोरकर गटातील एकही नगरसेवकाला संधी दिली नाही. त्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला. धानोरकरांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेत टायमिंग साधली.येणाऱ्या काळात मनपात सत्तांतर होणार अशी स्थिती आता निर्माण झाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now
