चंद्रपूर – (Chandrapur BJP Clash) चंद्रपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा रद्द झाल्यानंतर भाजपच्या दोन गटांमध्ये तीव्र संघर्ष उफाळला. आयुक्त व महापौरांच्या दालनासमोर आंदोलन झाले. त्यानंतर नगरसेवक आमनेसामने आले. अखेर दोन्ही गटांनी शहर पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी दाखल केल्या. (नागरिकांच्या प्रश्नांवर सभा रद्द, गटनेता शेट्टी यांचा आरोप)
चंद्रपूर महानगरपालिकेची ३ जुलै रोजी नियोजित सर्वसाधारण सभा अचानक रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त नरेश अनुकुरी आणि महापौर संगीता खांडेकर यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला. शहरातील नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी हिरावून घेणारा हा निर्णय तात्काळ मागे घेऊन नियोजित सर्वसाधारण सभा पूर्ववत घेण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या गोटातील भाजप नगरसेवकांनी केली. मात्र दुपारनंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या गोटातील भाजप नगरसेवकांनी गटनेत्याविरुद्ध नारेबाजी केल्याने भाजपचे नगरसेवक मनपा कार्यालयात भिडले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध नगरसेवकांनी तक्रार दिली.
Chandrapur BJP Clash मुळे चंद्रपूरचे राजकारण का तापले?
३ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यात शहराच्या विकासाशी तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय समाविष्ट होते. मात्र, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गटनेता पदासंदर्भातील वाद न्यायप्रविष्ट असल्याचे कारण पुढे करत संपूर्ण सभा रद्द करण्यात आली. प्रत्यक्षात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केवळ अजेंड्यातील विषय क्रमांक २२ वरच स्थगिती दिली असून, इतर कोणत्याही विषयावर किंवा इतर पक्षांच्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेवर कोणतीही स्थगिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले, असे असताना महापौर व आयुक्तांनी कसलीही पूर्वसूचना न देत थेट आमसभा रद्द केली.
त्यामुळे भाजप गटनेते शेखर शेट्टी यांनी नगरसेवकांसह मनपा कार्यालयात महापौर व आयुक्तांना सद्बुद्धी मिळो असा यज्ञ केला. दुपारनंतर भाजपचे मुनगंटीवार गोटातील नगरसेवक राहुल पावडे यांनी आपल्या समर्थकांसह नारेबाजी करीत गटनेत्याला हटवा अशी नारेबाजी केली. यामुळे दोन्ही गट आमनेसामने आल्याने धक्काबुक्की सुरु झाली, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर सदर प्रकरण काही वेळासाठी शांत झाले. मात्र नंतर दोन्ही गट शहर पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेले असता त्याठिकाणी सुद्धा दोन्ही गट पोलिसांसमोर भिडले. काही काळ तणाव निर्माण झाला मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
या संपूर्ण गोंधळावर महापौर संगीता खांडेकर म्हणाल्या कि उच्च न्यायालयाच्या आदेश असल्याने आम्ही आमसभा रद्द केली, जोरगेवार गोटातील महिला कार्यकर्त्याला बाळ विक्री प्रकरणी अटक झाल्याने त्या प्रकरणावरून नागरिकांचे लक्ष हटावे याकरिता त्यांनी महापौरांना टार्गेट करणे सुरु केले. शहरात विकास होत असताना आपल्या मर्जीतील लोकांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी मिळावी यासाठी गटनेता शेखर शेट्टी प्रयत्न करीत असल्याची प्रतिक्रिया देत महापौर खांडेकर यांनी या गंभीर प्रकारची पक्ष श्रेष्ठीकडे तक्रार देण्यात अशी माहिती दिली.
भाजप गटनेते शेखर शेट्टी यांनी सांगितले की, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार एकदा बोलावलेली सर्वसाधारण सभा काही अपरिहार्य कारणामुळे होऊ शकत नसल्यास ती पुढे ढकलता येते; मात्र संपूर्णपणे रद्द करण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे आयुक्त व महापौर यांनी घेतलेला निर्णय निवडणूक प्रक्रियेच्या नियमांचे उल्लंघन करणारा असून, तो लोकशाही मूल्यांना धक्का देणारा आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या सर्व काही आलबेल आहे असे म्हणता येत नाही, कारण कांग्रेस पक्षात आमदार विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दोन वेगळे गट तर भाजपात आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार असे दोन गट पडलेले आहे तर शिवसेना ठाकरे पक्षाने या परिस्थिती मध्ये थेट सत्तेसाठी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे.
सध्या कांग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याजवळ १६, आमदार विजय वडेट्टीवार जवळ १३, भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार ५, तर आमदार किशोर जोरगेवार जवळ १८ नगरसेवक आहे. पक्ष एकच असला तर नेत्यांमुळे सर्व नगरसेवक विखुरलेले आहे. चंद्रपूर शहरात नवजात बाळ विक्री प्रकरण गाजत आहे कारण याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या २ महिला आमदार जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक आहे. शिवसेना, भाजप व कांग्रेस पक्षाने सदर गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यापूर्वी मनपातील राजकारण तापले असे दिसत आहे.
चंद्रपुरातील या अभद्र राजकारणात शहरातील विकास पूर्णतः खुंटला आहे, नेते व नगरसेवक यांची भांडणे संपुष्टात येत नसल्याने सध्या वर्चस्वाची लढाई दोन्ही प्रमुख पक्षाकडून होताना दिसत आहे. कांग्रेस व भाजपच्या गटातील राजकारणाला शहरातील जनता कंटाळलेली असून समाजमाध्यमांवर या विरोधात संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे. येणाऱ्या काळात मनपा मधील राजकारण कोणत्या थराला पोहचेल हे काही सांगता येणार नाही.
Chandrapur BJP Clash प्रकरणात चंद्रपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा रद्द झाल्यानंतर भाजपच्या दोन गटांमध्ये मनपा कार्यालय आणि शहर पोलीस ठाण्यात धक्काबुक्की झाली. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या असून या घटनेमुळे शहरातील राजकारण पुन्हा तापले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






