Chandrapur Manpa News : सफाई कामगार वारसांचे उपोषण स्थगित

चंद्रपूर मनपा निर्णयामुळे सफाई कामगार वारसांना दिलासा; नोटीस रद्द, उपोषण स्थगित

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 4, 2026

चंद्रपूर : Chandrapur Manpa News अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेने सफाई कामगार वारसांच्या नियुक्तीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने जुनी नोटीस रद्द केली असून लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित केले आहे. या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. (संततधार पावसाचे पाणी घरात शिरले, बाबुपेठ मधील असंख्य घरात पाणी)

लाड-पागे समितीच्या शिफारसी व शासन निर्णयानुसार सफाई कुली/सफाई रेजा (सफाई कामगार) यांच्या वारसांना महानगरपालिका सेवेत सामावून न घेता प्रशासनामार्फत बजावण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात आल्याने मनपा कामगार वारसांनी उपोषण स्थगित केले आहे. आमदार सुधाकर अडबाले, महापौर संगीता खांडेकर यांनी उपोषणकर्त्यांना निंबू पाणी पाजून उपोषण सोडविले.

Chandrapur Manpa News : सफाई कामगार वारसांना मोठा दिलासा

दि. २२ जून २०२६ पासून मनपा कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत मा. महापौर, मा. आयुक्त, उपायुक्त, संबंधित अधिकारी व उपोषणकर्त्यांच्या प्रतिनिधींसमवेत सविस्तर बैठक संपन्न झाली.

बैठकीदरम्यान उपोषणकर्त्यांच्या मागण्या, शासन निर्णयातील तरतुदी तसेच संबंधित प्रशासकीय बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी महानगरपालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटीस तात्काळ रद्द करण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना दिले.

तसेच सफाई रेजा/कुली यांच्या नियुक्ती प्रक्रियेमधील अनियमितता व कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी, सन १२ ऑगस्ट १९७५ ते २३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीतील कर्मचाऱ्यांची सेवा-ज्येष्ठता यादी तपासून नियमानुसार नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात यावी तसेच सफाई कामगारांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार न्याय्य नियुक्ती देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

चंद्रपूर मनपाने सुजय भारत घडसे यांना नोटीस बजावून वारसा हक्क तत्वावर सेवेत सामावून घेता येणार नसल्याचे कळवले होते, ज्याविरोधात उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले. सदर प्रश्न मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुधाकर अडबाले यांनी लावून धरला. तसेच उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे व राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांच्याकडे उपोषणकर्त्यांच्या मागण्या सोडविण्यात याव्या, याबाबत बैठक लावण्याची विनंती देखील केली होती. त्यानंतर आज उपायुक्तांनी दिलेल्या पत्राद्वारे “ती” जुनी नोटीस पूर्णपणे रद्द करण्यात आली असून सफाई कुली व रेजा यांच्या वारसांना सुधारित तरतुदी लागू करण्याबाबत शासनाकडून तातडीने मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होताच लाड समितीच्या शिफारसीनुसार पुढील नियुक्तीची कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मनपा प्रशासनाने दिले आहे. प्रशासनाने लेखी पत्राद्वारे उपोषण मागे घेण्याची अधिकृत विनंती केल्यामुळे आंदोलकांनी आपले उपोषण तूर्तास मागे घेतले असून यामुळे वारसा हक्काच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सदर बैठकीस महापौर सौ. संगीताताई खांडेकर, मा. आयुक्त अकनुरी नरेश, उपायुक्त शेषराव टाले, उपायुक्त संदीप चिद्रवार, नगरसेवक प्रदीप (पप्पू) देशमुख, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक संतोष लहामगे, उपोषणकर्ते ॲड. सुजय घडसे, श्री. उमेश सत्रे, श्री. राजू उसरे, सोनाली इटनकर, योगिता घडसे, श्री. राजू राठोड, श्री. अजिंक्य कातकड, संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच उपोषणकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment