चंद्रपूर : (Chandrapur Safai Workers) चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या पात्र वारसांना तातडीने सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. बाबुपेठ संघर्ष समितीने प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे. शासन निर्णय आणि न्यायालयीन निर्देशांची अंमलबजावणी करून वारसांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष राजू कुडे यांनी स्पष्ट केले. (चंद्रपुरात ओबीसी, एसटी व एससी समाजाचा महामोर्चा)
लाड-पागे समितीच्या शिफारसी, शासन निर्णय आणि न्यायालयीन निर्देशांनुसार सफाई कुली/सफाई रेजा (सफाई कामगार) यांच्या पात्र वारसांना चंद्रपूर महानगरपालिकेच्या सेवेत तात्काळ सामावून घ्यावे, अन्यथा बाबुपेठ संघर्ष समिती तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा समितीचे अध्यक्ष राजू कुडे यांनी दिला आहे.
Chandrapur Safai Workers : पात्र वारसांना नोकरीची मागणी का?
सफाई कामगारांच्या पात्र वारसांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी दिनांक २२ जून २०२६ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने ५ डिसेंबर २०२४ रोजी पात्र वारसांकडून अर्ज मागवून झोननिहाय प्रत्यक्ष कामाचा अहवाल स्वीकारत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, त्यानंतर “१२ ऑगस्ट १९७५ ते २३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत अर्ज प्राप्त झाले नाहीत” या कारणावरून वारसांना नोकरी नाकारणे हे बेकायदेशीर, अन्यायकारक व शासन निर्णयाच्या विरोधातील असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राजू कुडे यांनी सांगितले की, बाबुपेठ परिसरातील अनेक सफाई कामगारांची कुटुंबे या प्रश्नामुळे प्रभावित झाली असून बाबुपेठ संघर्ष समिती त्यांच्या न्यायाच्या लढ्यात खंबीरपणे पाठीशी उभी आहे. अनेक वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सेवा बजावलेल्या सफाई कामगारांच्या कुटुंबियांना वारस हक्काने रोजगार देणे ही प्रशासनाची सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेने अतिरिक्त पदनिर्मितीसाठी २६ मे २०२५ रोजी नगर विकास विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन सर्व पात्र वारसांना महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, अशी आग्रही मागणी बाबुपेठ संघर्ष समितीने केली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे आंदोलकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आंदोलन सन्मानपूर्वक सोडवावे, अन्यथा बाबुपेठ संघर्ष समिती रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा स्पष्ट इशाराही राजू कुडे यांनी दिला.
यावेळी भाऊरावजी ढोके, विशाल सलोटे, जावेद सय्यद, बंडू सातपुते, महेंद्र खेकारे, हरिदास पिंगे, जयदेव देवगडे तसेच बाबुपेठ संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






