सासऱ्याला जाळण्याचा प्रयत्न प्रकरणी कोठारी पोलीस ठाण्याचे प्रतीकात्मक छायाचित्र

चंद्रपुरात सासऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, जावयाला अटक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 27, 2026

कोठारी – सासऱ्याला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कोठारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. झोपलेल्या ६५ वर्षीय दिवाकर मावलीकर यांच्यावर पेट्रोल ओतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, कुटुंबीयांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला. आरोपी राहुल दत्तात्रय रामटेके याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र इंगळे करत आहेत. (नशामुक्त चंद्रपुरसाठी पोलिसांची मोहीम, वाचा बातमी)

चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक वादातून एका संतापलेल्या जावयाने आपल्या साध्याभोळ्या वृद्ध सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवे ठार मारण्याचा अत्यंत खळबळजनक प्रयत्न केल्याची थरारक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोठारी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी जावयाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

सासऱ्याला जाळण्याचा प्रयत्न: घरात नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या व फिर्यादीनुसार मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कोठारी येथील वार्ड क्रमांक ४ मधील रहिवासी असलेले निखील दिवाकर मावलीकर यांनी कोठारी पोलीस ठाण्यात येऊन तोंडी तक्रार नोंदवली आहे. निखील यांची ३४ वर्षीय बहीण दीपिका ही वन विकास महामंडळात राऊड ऑफिसर म्हणून बामणी-तळोधी येथे नोकरीला असून, तिचे पती तथा आरोपी राहुल दत्तात्रय रामटेके (वय ३८, रा. कोठारी) हा खाजगी ठेकेदारीचे काम करतो. दीपिका या गेल्या सात-आठ महिन्यांपासून प्रसूती रजेवर माहेरी कोठारी येथे राहत होत्या. दरम्यान, गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दीपिका या पतीकडे गेल्या असता, व्हॉट्सअॅपचे स्टेटस का पाहिले नाही या क्षुल्लक कारणावरून राहुल रामटेके याने त्यांच्याशी भांडण करून त्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी निखील हे सोडवायला गेले असता आरोपी राहुलने त्यांच्या मानेवर धारदार शस्त्र वार करून जखमी केले होते. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून दीपिका या माहेरीच राहत होत्या.

बहीण-भावाच्या धाडसाने टळला अनर्थ

घटना घडलेल्या दिवशी, म्हणजेच सोमवारी दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दीपिका या आपले कपडे व सामान आणण्यासाठी पतीच्या घरी गेल्या होत्या. परंतु, आरोपी राहुल रामटेके याने कोणतेही सामान देण्यास स्पष्ट नकार दिल्याने दीपिका या पुन्हा आपल्या माघारी परतल्या. त्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दीपिका व त्यांचे कुटुंबीय घरात असताना, दीपिका यांच्या मोबाईलवर आरोपी राहुलने “मर्डर करायला येत आहोत” असा धमकीचा मॅसेज पाठवला. हा मॅसेज पाहताच संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले.

या धमकीनंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांतच आरोपी राहुल रामटेके हा घराचा गेट उघडून थेट घरात घुसला. यादरम्यान, फिर्यादीचे ६५ वर्षीय वडील दिवाकर बाबुराव मावलीकर हे घराच्या पोर्चमधील बाजेवर मोबाईल पाहत झोपलेले होते. घरात प्रवेश करताच “मी एका-एकाला जाळून व चाकुने कापून मारून टाकतो,” असे मोठ्याने ओरडत आरोपी राहुलने प्लास्टिकच्या बाटलीत आणलेले पेट्रोल थेट झोपलेल्या वृद्ध सासऱ्याच्या अंगावर ओतले. राहुल आपल्या खिशातून माचीस काढून सासऱ्याला पेटवण्याच्या तयारीत असतानाच, हे भयानक कृत्य पाहताच फिर्यादी निखील आणि त्यांची बहीण दीपिका यांनी धाव घेत त्याला झडप घालून पकडले.

या झटापटीदरम्यान आरोपी राहुलने स्वतःला सोडवण्यासाठी कंबरेतून धारदार चाकू बाहेर काढला, परंतु सतर्क असलेल्या दीपिका यांनी प्रसंगावधान दाखवत त्याच्या हातातील चाकू हिसकावून बाजूला फेकून दिला. या झटापटीच्या व आरडाओरड्याच्या आवाजामुळे शेजारील नातेवाईक सपना संजय चांदेकर, संयम उर्फ निक्की चांदेकर आणि रियाज शेख हे घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी न जुमानता आरोपी राहुलला पकडून ठेवले. याच संधीचा फायदा घेऊन फिर्यादीने तात्काळ पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली.

पळण्याचा प्रयत्न आणि मारहाण

पोलिस ठाण्यात माहिती देताच आरोपी राहुल तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा निखील यांनी त्याला घराबाहेर पुन्हा पकडले. संतापलेल्या आरोपीने निखील यांना तोंडावर चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या डाव्या हाताला दाताने जोरदार चावा घेऊन गंभीर जखमी केले. अवघ्या काही वेळातच कोठारी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी राहुल दत्तात्रय रामटेके याला तातडीने ताब्यात घेतले.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत कोठारी पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी राहुल रामटेके याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३३३, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३) आणि १०९(१) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र आत्माराम इंगळे हे करत असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या अत्यंत खळबळजनक प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

2 thoughts on “चंद्रपुरात सासऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, जावयाला अटक”

Leave a Comment