वरोरा : Warora Minor Girl Attack FIR प्रकरणात वरोरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आनंद निकेतन कॉलेजमधून घराकडे परतणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा रस्ता अडवून तिला शिवीगाळ करण्यात आली. आरोपीने तिच्या अंगावर चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची विचारणा करायला गेलेल्या मुलीच्या वडिलांवर आरोपीने लाकडी काठीने जोरदार प्रहार केला. मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात आरोपी राकेश नामे विरुद्ध बीएनएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे हि वाचा – अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी द्याल, तर कारवाई)
अश्लील शिवीगाळ करत अंगावर चप्पल मारण्याचा धाक दाखवला
वरोरा येथे इयत्ता १२ वीत शिकणारी अल्पवयीन विद्यार्थिनी ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर बसने आपल्या गावी पोहोचली. बसमधून उतरून ती आपल्या मैत्रिणीसोबत घराच्या दिशेने पायी जात असताना, समोरून आलेल्या राकेश नामे नावाच्या इसमाने तिला अडवले आणि तिच्या नावाचा उच्चार करत अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपी राकेश याने पायातील चप्पल काढून तिच्या अंगावर मारण्याचा धाक दाखवला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने तातडीने घर गाठून घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला.
आपल्या मुलीला झालेल्या त्रासाबद्दल विचारणा करण्यासाठी मुलीचे वडील तिच्यासह आरोपी राकेश नामे याच्या घराकडे निघाले. मात्र, गावच्या चौकात पोहोचताच आरोपी राकेश हातात लाकडी काठी घेऊन समोर आला. त्याने कोणतीही चर्चा न करता अचानक चिडून मुलीच्या वडिलांच्या उजव्या हातावर काठीने जोरदार प्रहार केला, तसेच मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मांडीवर लाथ मारून तिला हाताने मारहाण केली. या हल्ल्यात मुलीच्या पायाला दुखापत झाली असून तिच्या वडिलांच्या हाताला गंभीर सूज आली आहे.
हा वाद आणि आरडाओरड ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक तात्काळ मध्यस्थीसाठी धावून आले. प्रत्यक्षदर्शींनी प्रसंगावधान राखून आरोपीला बाजूला केले आणि भांडण सोडवले. नागरिकांचा जमाव जमल्याचे पाहून आरोपी राकेश घटनास्थळावरून पळून गेला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलगी आणि तिच्या वडिलांनी थेट वरोरा पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली व लेखी तक्रार नोंदवली.
वरोरा पोलिसांनी तक्रारीची तत्काळ दखल घेत ७ ऑगस्ट २०२६ रोजी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राकेश नामे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२ आणि अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोंटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गौराकार या प्रकरणाचा सखोल तपास करत असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






