Brahmapuri Police Inspector FIR संदर्भात ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन इमारत आणि पोलीस चौकशी

ट्रॅव्हल्स चालकाला भररस्त्यात बेदम मारहाण; न्यायालयाच्या आदेशाने निवृत्त पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरेंवर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 18, 2026

चंद्रपूर: Brahmapuri Police Inspector FIR नोंदवण्याचे स्पष्ट आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिल्यानंतर पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ब्रह्मपुरीचे तत्कालीन ठाणेदार तथा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्यावर एका ट्रॅव्हल्स चालकाला भररस्त्यात काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. चालकाचे डोके फोडणे, शिवीगाळ करणे आणि बेकायदेशीरपणे पोलीस ठाण्यात डांबून ठेवल्याप्रकरणी अखेर ब्रह्मपुरी पोलिसांत हा गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (हे हि वाचा – पंचायत समिती कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा)

Brahmapuri Police Inspector FIR: रेल्वे फाटकावरील वादातून भरचौकात चालकावर लाठीहल्ला

खाजगी बस चालकाला भररस्त्यात अश्लील शिवीगाळ करत पोलीस काठीने डोके फोडणे आणि पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर डांबून ठेवणे ब्रह्मपुरीचे तत्कालीन ठाणेदार तथा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट, ब्रह्मपुरी यांनी फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक २८/२०२४ मध्ये दिलेल्या आदेशानुसार, ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात निवृत्त पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्याविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ख्रिस्तानंद चौकात अमानुष मारहाण; चालकाचे डोके फोडून बस केली डिटेन

प्राप्त माहितीनुसार, वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी आणि नागपूरच्या हुडकेश्वर भागात वास्तव्यास असलेले मोहन शालीकराम अडिवकर (वय ४२) हे ट्रॅव्हल्स चालक म्हणून कार्यरत आहेत. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी ते आपली ट्रॅव्हल्स बस (क्र. MH-49-AT-3625) घेऊन प्रवाशांसह गडचिरोलीवरून नागपूरच्या दिशेने जात होते. दुपारी सुमारे साडेतीन वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी रेल्वे गेट बंद असल्याने त्यांची बस इतर वाहनांमागे उभी होती. रेल्वे फाटक उघडल्यानंतर समोरील वाहने पुढे जात असताना, मागून विरुद्ध दिशेने (रॉंग साईड) एक फिक्कट आकाशी रंगाची इनोव्हा कार (क्र. MH-29-AR-8855) आली. त्या कारमधून खाजगी कपड्यांमध्ये उतरलेल्या एका व्यक्तीने बस अडवून चालकाला अत्यंत घाणेरड्या आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करत थांबण्याचा इशारा केला. वाहतूक कोंडीमुळे चालकाने थांबण्यास असमर्थता दर्शवताच सदर इसम इनोव्हा कारने वेगाने ब्रह्मपुरीच्या दिशेने निघून गेला.

पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास नकार आणि पुराव्यांची छेडछाड

त्यानंतर ट्रॅव्हल्स बस दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद हॉस्पिटल चौकात थांबली असता, इनोव्हामधून आलेला तोच इसम अचानक बसजवळ आला. चालक काही समजण्याच्या आतच त्या इसमाने त्याला खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी तेथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस फिरोज पठाण तेथे पोहोचले. त्या इसमाने पठाण यांच्या दुचाकीला लावलेली पोलीस लाठी स्वतःच्या हातात घेतली. त्यानंतर चौकशीत मारहाण करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार सुधाकर अंभोरे असल्याचे स्पष्ट झाले. अंभोरे यांनी चालकाच्या पायावर आणि थेट डोक्यावर शासकीय लाठीने जोरदार प्रहार केले. या भीषण मारहाणीत चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्त वाहू लागले. इतकेच नव्हे तर ‘इथे आमचेच राज्य चालेल’ अशी दर्पोक्ती करत त्यांनी बसमधील कंडक्टर मनीष भोयर यालाही मारहाण केली.

गंभीर जखमी झालेल्या चालकाने जवळच असलेल्या ख्रिस्तानंद रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची याचना केली असता, अंभोरे यांनी बसमधील सर्व प्रवाशांना जबरदस्तीने खाली उतरवले आणि रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या चालकालाच बळजबरीने गाडी चालवून पोलीस ठाण्यात नेण्यास भाग पाडले. ठाण्यात नेऊन त्याची अल्कोहोल टेस्ट घेण्यात आली, जी निगेटिव्ह आली. त्यानंतर एका पोलिसाने दमदाटी करून चालकाच्या मोबाईलचा लॉक क्रमांक घेतला आणि घटनेवेळी नागरिकांनी केलेले चित्रीकरण व पुरावे डिलीट केले. रात्रीच्या सुमारास चालकाला स्वतःच्या खर्चाने सीटी स्कॅन करून घ्यावे लागले. उपचारानंतर जेव्हा चालक ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला, तेव्हा कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोळे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रशांत खोब्रागडे यांनी ठाणेदार अंभोरे यांची पाठराखण करत चालकाची तक्रार घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्याला हाकलून लावले.

ब्रह्मपुरी न्यायालयाच्या आदेशानंतर भादंवि कलम ३२४ सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

स्थानिक पातळीवर पोलीस दाद देत नसल्याने चालकाने उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक, तसेच लोकप्रतिनिधींकडे लेखी दाद मागितली. अखेर चालकाने ब्रह्मपुरी न्यायालयात धाव घेत कलम १५६ (३) अन्वये दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानंतर ब्रह्मपुरी पोलिसांनी निवृत्त पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ (अश्लील कृत्य व शिवीगाळ), ३२४ (धोकादायक हत्याराने दुखापत करणे), ३४१ (बेकायदेशीर अडवणूक), ५०४ (शांतता भंगाच्या उद्देशाने अपमान) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४५(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेवणसिद्ध कदम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तक्रारदाराने आरोप केलेल्या इनोव्हा कारच्या मालकीबाबतही प्रश्न उपस्थित केले असून, एका वरिष्ठ निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment